ठाणे : जितेंद्र आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनावर २ वाजता निकाल | पुढारी

ठाणे : जितेंद्र आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनावर २ वाजता निकाल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; ठाणे येथील उड्डाण पुलाच्या उदघाटनाला मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यानंतर माझ्या विरुद्ध घाणेरडे राजकारण होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा सदस्यत्वाचा थेट राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी तातडीने ठाण्यात दाखल होत महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का देणारे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगितले होते. दरम्यान यासंदर्भात आज ठाणे जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दुपारी २ वाजता निकाल देण्यात येईल असे आदेश न्यायाधीश प्रणव गुप्ता यांनी दिले.

रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे कळवा येथील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात एकत्रित उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी बाहेर पडत असलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असताना आव्हाडांनी आपला विनयभंग केला अशी तक्रार भाजपच्या एका चाळीस वर्षीय महिला कार्यकर्तीने मुंब्रा पोलीस स्थानकात केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्यावर कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

तर मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत जाळपोळ, ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी करण्यात आली. इतकेच नव्हे तर ठाण्यातील राजकीय वातावरण देखील पेटले होते. त्यानंतर आज मंगळवारी या संदर्भातील सुनावणीत आपली बाजू मांडताना आव्हाड यांच्या वकिलांनी राजकीय वादातून मुद्दामहून खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्या महिलेला मी तीन वर्षांपासून ओळखत असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या छट पूजेला एक जाहीर कार्यक्रमात त्या माझ्या बहीण असल्याचे सांगितले होते. माझ्या बहिणीसोबत मी असे का करेन असा प्रतिवाद करण्यात आला आहे. दरम्यान न्यायाधीश गुप्ता यांनी दोन वाजता निकाल देण्यात येईल असा आदेश दिला आहे.

हेही वाचा :  

Back to top button