ठाणे : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन | पुढारी

ठाणे : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते संजीव साने यांचे निधन

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, स्वराज्य इंडिया अभियानचे महाराष्ट्राचे महासचिव संजीव साने (वय ६५) यांचे आज (दि.२८) निधन झाले. दुर्धर आजारावरील उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर हॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. अखेर आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी प्रा. नीता व मुलगा निमिष व मोठा मित्र असा परिवार आहे.

संजीव साने साथी मधु लिमये जन्मशताब्दी समारोह समितीचे निमंत्रक होते. त्यांनी आणीबाणी विरोधी कार्यापासून सामाजिक, राजकीय कामाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. ते समता आंदोलन, समाजवादी जनपरिषदचे संस्थापक सदस्य व पूर्णवेळ कार्यकर्ते होते. ते एन्रॉन विरोधी कृती समितीचे सह निमंत्रक व रायगडमधील सेझ आंदोलनाचे सह निमंत्रक होते. जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात ते स्मृतीशेष ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी जागतिकीकरण विरोधी कृती समितीच्या कार्यात एन. डी. सरांच्या सोबत निमंत्रक म्हणून काम केले आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे विश्वस्त होते. त्यांचा विचारवेध संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग होता. वडघर ( माणगाव) येथे झालेल्या तेराव्या विचारवेध संमेलनाचे ते संयोजक होते. त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे.
संजीव साने यांनी डॉ. यशवंत सुमंत यांच्यासोबत पुणे येथील महात्मा फुले वाडा ते गांधींचा वर्ध्याचा आश्रम ‘ महात्मा ते महात्मा’ या ऐतिहासिक पदयात्रेचे संयोजनात सहभाग घेतला होता.

संजीव साने यांनी रेमिंग्टन या टाईपरायटर कंपनीत नोकरी केली. कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक, राजकीय कार्यात झोकून दिले. त्यांनी आप पार्टीच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. संजीव साने यांना वर्धा येथील दाते संस्थेचे वतीने डॉ. भा.ल. भोळे स्मृती कार्यकर्ता पुरस्कार तसेच निळू फुले स्मृती पुरस्काराने सन्मानित केले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button