Babar Azam : पाकिस्तानात संघात बंडखोरी, बाबर आझमच्या कॅप्टनसीवर संकट | पुढारी

Babar Azam : पाकिस्तानात संघात बंडखोरी, बाबर आझमच्या कॅप्टनसीवर संकट

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2022 Pakistan Babar Azam : टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानची अवस्था वाईट झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर रोहर्षक विजय मिळवला. त्यानंतर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. विश्वचषकातील सलग दोन पराभवांमुळे बाबरचा संघ तर बिथरला आहेच, पण पाकिस्तानातही खळबळ उडाली आहे.

एक प्रकारे संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे. हे कसे घडले हे पाकिस्तानातील कोणालाही समजू शकत नाही. आता पाकिस्तानी संघ अशा उंबरठ्यावर उभा आहे जिथे त्यांना अजून एक पराभव पत्करावा लागला तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे. तर पुढील तिन्ही सामने जिंकूनही पाकिस्तानी संघ उपांत्य फेरी गाठू शकेल, हेही निश्चित नाही. संघाला इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान, ज्याच्यावर पराभवाचे खापर फोडता येईल अशा बळीच्या बक-याचा शोध घेतला जात असल्याचे समजते आहे.

पाकिस्तानी संघाच्या निवडीवर प्रश्न

पाकिस्तानी संघाची टी-20 विश्वचषकासाठी निवड झाली, तेव्हापासून असे मानले जात होते की हा संघ खूपच कमकुवत आहे. त्यामुळे संघ पहिल्या फेरीतून बाहेर पडला तर फार मोठी गोष्ट नसेल असेही अनेकांनी व्यक्त केले होते. तर याचा अंदाज पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंना आधीपासूनच होता. आता त्या गोष्टी ख-या होताना दिसत आहेत. दरम्यान, कर्णधार बाबर आझमने स्पर्धेतील दोन्ही सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली आहे. भारताविरुद्ध तो गोल्डन डक तर झिम्बाब्वेविरुद्ध 9 चेंडू खेळून 4 धावा करून पॅव्हेलियमध्ये परतला.

इतकंच नाही तर आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज मोहम्मद रिझवानही विश्वचषकात फ्लॉप ठरला आहे. पाक संघाची मधली फळी आधीच कमकुवत मानली जात होती. सलामीवीर बाबर आझम आणि रिझवान हेच संघासाठी आधास्तंभ होते. मात्र हे दोघेही ऐनवेळी फेल झाल्याने संपूर्ण संघाची पोलखोल झाली आहे. दरम्यान, बाबर आझमच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाकिस्तानात एक खुर्ची

पीसीबीच्या निवष समितीचे प्रमुख मोहम्मद वसीम यांच्यावर निशाणा साधला जात आहे. एवढ्या वाईट संघाची निवड करून तो टी 20 विश्वचषकासाठी का पाठवला असा सवाल उपस्थित केला जात आहे. पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरेतर भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानमध्ये नेहमीच कुणालातरी बळीचा बकरा बनवला जाते, यावेळीही तेच घडत असल्याचे चित्र आहे. आता या सर्व प्रकरणात नेमका कुणाचा बळी जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यासाठी सर्वांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाकिस्तानला अजून तीन सामने खेळायचे आहेत. सेमीफायनल पर्यंत हा संघ मजल मारू शकला नाही तर त्यांना पाकिस्तानला परतावे लागेल. त्यानंतरच काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.

सोशल मीडियावर पाकिस्तानात धुमाकूळ..

दरम्यान, पाकिस्तानी चाहत्यांमध्येही निराशेचे वातावरण आहे. सर्व YouTube चॅनेलवर व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चाहते टीमच्या कामगिरीवर टीकेची झोड उठवत आहेत. अनेक युजर्सनी तर काही खेळाडू हे बाथरूम क्रिकेटर असल्याची टीप्पणी केली आहे. तसेच पाकिस्तानी चाहत्यांनी पुढे सामने न बघता माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी परतीची तिकिटेही काढली आहे.

Back to top button