

Share Market Today : संमिश्र जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शुक्रवारी (दि.२८) किरकोळ वाढ दिसून आली. मारुती सुझुकी, RIL हे टॉप गेनर्स ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २ टक्क्यांहून अधिक वधारले. दरम्यान, मेटल शेअर्सवर दबाव राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवातीपासूनची तेजी बाजार बंद होताना कायम राहिली. सेन्सेक्स २०३ अंकांनी वाढून ५९,९५९ वर बंद झाला. तर निफ्टी ४९ अंकांनी वधारुन १७,७८६ वर बंद झाला. सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात २०० हून अधिक अंकांनी वाढला आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ११ पैशांनी वाढून ८२.३८ वर खुला झाला होता. पण त्यानंतर रुपया १५ पैशांनी घसरून ८२.४८ वर बंद झाला. गुरुवारी रुपया ८२.४९ वर बंद झाला होता. (Share Market Today)
दरम्यान, बँक ऑफ जपानच्या व्याजदराच्या निर्णयामुळे आशियातील समभाग घसरले. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६३ टक्क्याने घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी किंचित खाली आला होता. हाँगकाँगमधील हँग सेंग निर्देशांक ०.१ टक्के घसरला. तर चीनमधील शांघाय कंपोझिट ०.५८ टक्क्यांनी घसरला आहे.
मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) निव्वळ नफ्यात सप्टेंबरच्या तिमाहीत चार पटीने वाढ झाली. मारुती सुझुकीने २,०६१ कोटी रुपयांच्या नफ्याची नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ४७५ कोटी रुपये नफा मिळवला होता. या तिमाहीत विक्रीत ४७.९१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे मारुती सुझुकीचे शेअर्स वधारले.
प्रमुख बँका येत्या काही महिन्यांत व्याजदर वाढीचा वेग कमी करतील या अपेक्षेने काल गुरुवारी (दि.२७) आशियाई समभाग वाढले होते. या पार्श्वभूमीवर तसेच मेटल समभागातील मजबूतीमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.२७) तेजी दिसून आली. गुरुवारी सेन्सेक्स २१२ अंकांनी वाढून ५९,७५६ वर बंद झाला होता. निफ्टी ८० अंकांनी वाढून १७,७३६ वर बंद झाला होता.
हे ही वाचा :