ठाणे : पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये एसी बसविण्यास ब्रेक | पुढारी

ठाणे : पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये एसी बसविण्यास ब्रेक

भाईंदर; राजू काळे :  मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त श्रीकांत पाठक यांनी नुकताच एक आदेश काढून पोलीस ठाण्यासह बिट चौक्या, गुन्हे शाखा व त्या अंतर्गत असलेल्या शाखांमध्ये बेकायदेशीर बसविण्यात आलेले वातानुकूलित यंत्रे (एसी) तात्काळ काढून टाकण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे एसीची आवश्यकता नसतानाही पोलिस ठाण्यातील दालनात तसेच बिट चौक्यांमध्ये बसविलेल्या एसीद्वारे ठंडाठंडा कुलकूल होण्याचा पोलीस अधिकार्‍यांचा फंडा मोडीत निघाला आहे.

काही शासकीय अधिकारी आपल्या वातानुकूलित दालनातच ठाण मांडतात. ते अनेकदा नागरी समस्यांचे अथवा तक्रारींचे निवारण प्रत्यक्ष जागेवर न जाता आपल्या कनिष्ठांकडून देण्यात येणार्‍या माहितीवर विसंबून राहून दालनात बसूनच करतात. तसेच वातानुकूलित दालनातून पुन्हा चारचाकीतून थंडगार प्रवास करुन घटनास्थळाची वा समस्या असलेल्या जागांचा दौरा करतात अथवा पाहणी करतात. यामुळे नागरी समस्या वा तक्रारींमधील गांभीर्याची परिपूर्ण माहिती न घेताच संबंधित अधिकारी समस्या, तक्रारी निकाली निघत आहे.
अशा अधिकार्‍यांविरोधात लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यांनी या अधिकार्‍यांसह अधिकार्‍यांच्या दालनात बसविण्यात आलेल्या एसी विरोधात आयुक्तालयाकडे अनेक तक्रारी केल्या. संबंधित अधिकार्‍यांच्या अंगी आपल्या दालनात ठोस कारणाअभावी एसी बसवून
थंडगार हवा खाण्याची सवय अंगवळणी पडली आहे.

हा प्रकार बेकायदेशीर तसेच शासकीय निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींची गंभीर दखल मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी घेतली आहे. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार अप्पर पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाणे, बिट चौक्या, गुन्हे शाखा व त्या अंतर्गत असलेल्या सर्व शाखांमध्ये बेकायदेशीरपणे बसविण्यात
आलेले वातानुकूलित यंत्रे तात्काळ काढून टाकण्याचा आदेश नुकताच जारी केला आहे. हि यंत्रे काढण्यात आली आहेत किंवा नाही त्याची
खातरजमा करण्यासाठी संबंधित परिमंडळ व गुन्हे शाखांच्या उपायुक्तांना स्वत: पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  •  पोलिस अधिकार्‍याव्यतिरीक्त इतर कोणत्याही अधिकार्‍याच्या दालनात तसेच पोलीस ठाणे, बिट चौक्या, गुन्हे शाखा व त्या अंतर्गत असलेल्या शाखांमधील कक्षांमध्ये ती यंत्रे बसविता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तशा सक्त सूचना सर्व
    पोलीस अधिकारी, अंमलदारांना उपायुक्तांमार्फत देण्यात याव्यात. त्याच्या कार्यवाहीचा अहवाल आदेश जारी केल्यापासून 7 दिवसांत आयुक्तालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात अप्पर पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशामुळे आपल्याच दालनात बसून
    थंडगार हवेची लयलूट करणार्‍या अधिकार्‍यांवर थंड हवेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने या आदेशाविरोधात संबंधित अधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

Back to top button