डोंबिवली : धडक दिल्याच्या रागातून टेम्पोचालकावर हल्ला | पुढारी

डोंबिवली : धडक दिल्याच्या रागातून टेम्पोचालकावर हल्ला

डोंबिवली;  पुढारी वृत्तसेवा :  टेम्पोने धडक दिल्याच्या रागातून कारचालक व त्याच्या साथीदारांनी टेम्पो चालकासह भांडण सोडवणार्‍यावर जीवघेणा हल्ला केला. कल्याण-शिळ मार्गावरील सोनारपाडा ते शंकरानगर दरम्यान धक्कादायक घटना घडली.
या प्राणघातक हल्ल्यामध्ये टेम्पो चालक आणि सदर तरूण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलिसांनी हल्लेखोर पंडित म्हात्रे व त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

सोनारपाड्यातील शंकरनगरमधून रविवारी रात्री मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन टेम्पोचालक हर्षद रसाळ हा कल्याण-शिळ मार्गा जात होता. इतक्यात समोरून येणार्‍या एका कारला हर्षदच्या टेम्पोचा धक्का लागला. त्यामुळे संतापलेला कारचालक पंडित म्हात्रे आणि हर्षद रसाळ यांच्यात वाद झाला. या वादविवादामध्ये हर्षदचा मित्र विशाल मिश्रा याने मध्यस्थी केल्याने पंडित म्हात्रे अधिकच भडकला. त्याने फोन करून अन्य काही लोकांना बोलावून घेतले. पंडित म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी हर्षद व विशाल यांना मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने सपासप वार करून दोघांना जखमी केले.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हल्ला करणार्‍या पंडित म्हात्रेसह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विशाल व हर्षद या दोघांना उपचारांसाठी एमआयडीसीच्या निवासी विभागातील वेगवेगळ्या खासगी
रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
हल्लेखोर कोण आहेत? कुठे राहणारे आहेत? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Back to top button