ठाणे : शहरातील आदिवासी पाड्यांसाठी आता फिरते आरोग्य केंद्रे सुरू | पुढारी

ठाणे : शहरातील आदिवासी पाड्यांसाठी आता फिरते आरोग्य केंद्रे सुरू

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यात आजही असे काही आदीवासी पाडे आहेत, ज्या ठिकाणी पुरेशा सोई सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र आता येथील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील 20 आदिवासी पाड्यांमध्ये फिरते आरोग्य केंद्र सज्ज केले आहे. अद्ययावत अशा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हे फिरते आरोग्य केंद्र सज्ज करण्यात आले असून यामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्‍तीस्थळावर या आरोग्य केंद्राचा शुभारंभ केला. या फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा
मोफत उपलब्ध होणार असल्याचा विश्‍वास महापालिकेचे उपायुक्‍त मनीष जोशी यांनी व्यक्‍त केला आहे.
ठाणे महापालिका आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून या फिरत्या आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हा फिरते आरोग्य केंद्र आदीवासी पाड्यात जाणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसर हा ठाणे महापालिकेच्या हद्दीत येत असून याठिकाणी 18 आदिवासी पाडे आहेत. त्यामध्ये येऊर गाव, एअर फोर्स, भेंडीपाडा, रोणाचा पाडा, नारळीपाडा, आश्रम परिसर, पाटोणापाडा, जांभूळपाडा, वणीचा पाडा, पाचवडपाडा, बोरुवडेपाडा, देवीचा पाडा, टक्‍कर पाडा, पानखंडा, बामनोलीपाडा, नवापाडा, कशेळीपाडा, अवचितपाडा या पाड्यांचा समावेश आहे.

या रुग्णवाहिकेद्वारे सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 या वेळेत पाड्यांवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून यामध्ये आरोग्य तपासणी, गरोदर मातांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, जखम झाली असल्यास मलमपट्टी करणे, सर्प दंश झाल्यास प्राथमिक उपचार करणे तसेच इतर आरोग्य तपासण्या आणि उपचाराची सुविधा
फिरते आरोग्य केंद्राद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे केंद्र वातानुकूलीत असणार आहे. या वाहनांमध्ये वेंटीलेटरचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्‍तीवर प्राथमिक उपचार
करून त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने
स्पष्ट करण्यात आले आहे.

50 ठिकाणी आपला दवाखाना

ठाणे शहराची लोकसंख्या 26 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यापैकी 52 टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळीमध्ये राहतात. आरोग्य निकषांनुसार प्रत्येक 30 ते 40 हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे
आवश्यक आहे. परंतु ठाण्यात एक ते दीड लाख लोकसंख्येचा भार एका आरोग्य केंद्रावर पडतो. ठाण्यातील विद्यमान 27 आरोग्य केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरात 50 ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिकेने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी दवाखाने सुरु केले आहेत. त्या माध्यमातून नागरिकांना विनामुल्य आरोग्य
सुविधा मिळत आहे. असे असले तरी शहरातील आदिवासी पाड्यांवर अशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे
नागरिकांना शहरात यावे लागते.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याठिकाणी फिरते आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे.

Back to top button