वसई : रासायनिक मिश्रित सांडपाणी सोडल्याने नाल्यातील मासे मृत | पुढारी

वसई : रासायनिक मिश्रित सांडपाणी सोडल्याने नाल्यातील मासे मृत

खानिवडे: पुढारी वृत्तसेवा : वसईतील औद्योगिक कारखान्यातून रसायन युक्त सांडपाणी नदीपात्रात सोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील पाटील पाडा येथे एका कारखान्यातून रसायन मिश्रित पाणी प्रक्रियेविनाच वाहत्या नाल्यात सोडल्याने पात्रातील मासे मृत झाले आहेत.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्यापाठोपाठ औद्योगिक कारखानेही वाढू लागले आहेत. यात अनेक कारखान्यात विविध प्रकारचे साहित्य तयार करण्यासाठी रसायन मिश्रित द्रवपदार्थ वापरले जातात. कारखान्यातून निघणारे सांडपाणी हे प्रक्रिया करून ते नाल्यात सोडणे आवश्यक आहे. असे असताना रसायन मिश्रित सांडपाणी नाल्यात, नदीत सोडून दिले जात आहे. याचा मोठा फटका खाडी व नदीपात्रात असलेल्या जैविक घटकांना बसू लागला आहे. वसई पूर्वेच्या चिंचोटी भागात अनेक औद्योगिक कारखाने उभे राहिले आहेत. पाटील पाडा येथे असलेल्या एका कारखान्यातून रसायन मिश्रित पाणी इतर सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात सोडून दिले जात असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

या रासायनिक पाण्यामुळे या नदीमध्ये असलेले शेकडो मासे मृत झाले आहेत. अशा प्रकारे पाणी सोडून नदी प्रदूषित केली जाऊ लागली आहे. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने रासायनिक सांडपाणी हे नदीपात्रात सोडून देण्याचे प्रकार सुरूच आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारखान्यांची तपासणी करून ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात. त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

नदी व खाडीपात्रात अनेक नागरिक मासेमारी करुन त्यावर दैनंदिन उपजीविका करतात. विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात मासे मिळतात त्यातून चांगला रोजगार ही मिळतो. परंतु, या रासायनिक सांडपाण्यामुळे मासे मृत होत असल्याने मासेही मिळत नाहीत. तर दुसरीकडे नदीकाठी अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन नापीक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button