आठ वर्षांत डाळिंबाचे क्षेत्र दुप्पट; महाराष्ट्राबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशातही होतेय लागवड | पुढारी

आठ वर्षांत डाळिंबाचे क्षेत्र दुप्पट; महाराष्ट्राबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशातही होतेय लागवड

सोलापूर ः संतोष सिरसट : राज्यात मागील आठ वर्षामध्ये डाळिंबाचे क्षेत्र दुपटीपेक्षा जास्तीने वाढले आहे. सोलापुरात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची 2005 मध्ये सुरुवात झाली, त्यावेळी 1 लाख 12 हजार हेक्टर होते, ते आता 2 लाख 83 हजार हेक्टरवर पोहोचले आहे. महाराष्ट्रात हेच क्षेत्र 1 लाख 66 हजारावर पोहोचले आहे.एवढेच नाही तर आता महाराष्ट्राबरोबरच शेजारील गुजरात, कर्नाटक मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही शेतकरी डाळिंबाच्या शेतीकडे वळू लागले आहेत.

डाळिंब हे फळ आहारासाठी उपयुक्त असे फळ आहे. डाळिंबाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातीलही काही ठरावीक जिल्ह्यातच क्षेत्र जास्त आहे. डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी लागणारे हवामान ज्या जिल्ह्यात पोषक असते त्याठिकाणी डाळिंबाची लागवड वाढू लागली आहे. डाळिंब पीक हे प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात खानापूर-आटपाडी, जत, तासगाव या तालुक्यांमध्ये पीक घेतले जाते. अहमदनगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना आदी जिल्ह्यांमध्येही डाळिंब उत्पादन केले जाते.

पूर्वी केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले डाळिंब आता राज्याच्या सीमा ओलांडून दुसर्‍या राज्यातही गेले आहे. देशात केवळ डाळिंब या पिकासाठी केंद्राच्या कृषी विभागाने सोलापूर येथे एकमेव राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सुरु केले. ज्याप्रमाणे द्राक्ष पिकासाठी पुण्याजवळील मांजरी येथे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे. त्याच धर्तीवर सोलापूर येथेही डाळिंब संशोधन केंद्र सुरु केले आहे. सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र सुरु झाल्यापासून राज्यात डाळिंबाच्या लागवड क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ झाली.

सोलापुरात डाळिंब संशोधन

केंद्राच्या सुरुवातीच्या काळापासून काम केले आहे. केंद्रात तेव्हापासून संशोधन सुरु आहे. शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम आम्ही करतो. संशोधन केंद्र सुरु झाल्यापासून महाराष्ट्रासह इतर राज्यातही डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
– डॉ. राजीव मराठे, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

Back to top button