ठाणे : मिरा-भाईंदरची अग्निसुरक्षा होणार सक्षम | पुढारी

ठाणे : मिरा-भाईंदरची अग्निसुरक्षा होणार सक्षम

भाईंदर; राजू काळे :  मिरा-भाईंदर महापालिकेचा अग्निशमन विभाग वाढत्या लोकवस्तीच्या अनुषंगाने अद्यावत होत असला तरी या विभागाची केंद्रे त्याच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हि केंद्रे वाढवून शहरातील
आपत्कालीन संकटात घटनास्थळी तात्काळ पोहोचून या विभागाच्या दलाकडून बचावकार्य त्वरीत होण्यासाठी
आयुक्त दिलीप ढोले यांनी नवीन अग्निशमन केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराच्या नवीन विकास
आराखड्यात हि 6 नवीन केंद्रे प्रस्तावित करून त्याच्या तरतुदीची कार्यवाही सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घडणार्‍या दुर्घटनेवेळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचणे अडचणीचे ठरत असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता. अग्निशमन दलात मोठी
स्टँडर्ड वाहने असल्याने हि वाहने घटनास्थळी पोहोचत नव्हती. त्याला पर्याय म्हणून आयुक्तांनी या विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सादर केलेल्या 6 मिनी वॉटर टेंडर वाहने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या 75 व्या अमृत महोत्सव दिनी 6 मिनी वॉटर टेंडर वाहनांचे
लोकार्पण करून ती अग्निशमन सेवेत दाखल केली. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मिनी वॉटर टेंडर वाहने दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सहजरित्या पोहोचून तेथील आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकणार आहेत.
परिणामी येथील बचावकार्य सुद्धा वेगाने होऊन अग्निशमन दलाची सेवा तत्पर ठरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

15 ऑगस्ट रोजी अग्निशमन दलाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यात विभागाचे उपायुक्त मारुती
गायकवाड यांनी अग्निशमन दलाची 6 नवीन केंद्रे प्रस्तावित करण्यात आल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्याचा मागोवा घेतला असता हि 6 नवीन केंद्रे सध्या तयार करण्यात येत असलेल्या शहराच्या नवीन विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली आहेत. हि नवीन केंद्रे लोकवस्तीच्या अनुषंगाने प्रत्येकी 5 किलो मीटर अंतरावर सुरू केली जाणार असून त्यादृष्टीने तरतूद करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सध्या 5 अग्निशमन केंद्रे सुरू

शहरात सध्या अग्निशमन दलाच्या एका मुख्यालयासह 5 अग्निशमन केंद्रे सुरू आहेत.
त्यात भाईंदर पश्चिमेकडील स्व. कल्पना चावला अग्निशमन मुख्यालयासह सिल्वर पार्क,
उत्तन पाण्याची टाकी, नवघर पाण्याची टाकी व कनाकीया येथील अग्निशमन केंद्रांचा
समावेश आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी पेणकार पाडा येथील दर्वेश हाईट या गृहसंकुलाच्या
बांधकामापोटी पालिकेला प्राप्त झालेल्या सुविधा भूखंडावर बांधण्यात आलेल्या नवीन
6 व्या अग्निशमन केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Back to top button