कल्याणच्या एसटी बस आगारात चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीचा फायदा घेत दागिने, मोबाईल लंपास | पुढारी

कल्याणच्या एसटी बस आगारात चोरट्यांचा सुळसुळाट; गर्दीचा फायदा घेत दागिने, मोबाईल लंपास

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणच्या एसटी बस आगारात गेल्या दोन महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते.आता गणेशोत्सव काळात बस आगारांमध्ये गणपतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची तुडुंब गर्दी होणार असल्याने चोरांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. दरम्‍यान, बसमध्ये चढताना एका प्रवाशाचा मोबाईल चोराने लांबवला आहे. या संदर्भात दहिसरमोरी येथे राहणारे मोहम्मद कलीन खान (वय 33) यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मोहम्मद खान हे कल्याणच्या एसटी बस आगारातून पनवेल येथे जाणाऱ्या बसमध्ये गुरुवारी दुपारी चढत होते. त्यावेळी दरवाजात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याचा गैरफायदा घेत प्रवासी म्हणून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्याने मोहम्मद खान यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. गर्दीमुळे हा प्रकार मोहम्मद यांच्या लक्षात आला नाही. बसमध्ये चढल्यावर ते मोबाईल शोधू लागले. हातातील मोबाईल कुठेतरी पडला असावा, म्हणून ते बसमधून खाली उतरले. मात्र त्यांना मोबाईल कुठेही आढळून आला नाही. आपल्या पाठीमागे असलेला एक तरुण बसमध्ये चढत असताना रेटारेटी करत होता. त्यानेच हाताला हिसका देऊन मोबाईल पळविला असल्याचा संशय व्यक्त करत मोहम्मद यांनी त्या अज्ञात चोरटयाविषयी तक्रार दाखल केली.

भंडारा: वैनगंगा नदीत नाव बुडाली; ६ जण बचावले

यापूर्वी अशाच अनेक घटना या आगारात घडल्या आहेत. कल्याण जवळच्या बापगाव नाक्यावरील वास्तू रचना वृंदावन इमारतीमध्ये राहणारे दीपेश जंगम हे शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी कल्याणच्या एसटी डेपो येथे आले. बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली. ही बाब जंगम यांच्‍या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करत नागरिकांच्या मदतीने चोरटयाला पकडले. त्‍याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्‍यात दिले.

डोंबिवली पूर्वेकडील रामनगरमधल्या सूर्यवंशी चाळीत राहणारे भूषण अशोक सूर्यवंशी (36) हे शनिवारी रात्री  कल्याण पश्चिमेतील एसटी डेपोत आले होते. अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातील मोबाईलवर डल्‍ला मारला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दीड वाजता लक्षात आल्यानंतर भूषण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सोमवारी पहाटेच्या सुमारास महात्मा फुले चौक पोलिसांचे पथक कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना संशयास्पदरित्या आढळून आलेल्या समाधान मोरे (45), निलेश शेलार (19) काल्या तिवारी (25), गोकुळ सोनवणे (26) सम्राट शिंदे (25) आणि नदीम पठाण (30) या 6 जणांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान या टोळीकडून पोलिसांनी धारदार शास्त्र, लुटमार करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा आणि एक विना नंबरप्लेटची दुचाकीही जप्त केली. या आधीही या 6 जणांवर 15 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील उघड झाली आहे.

जेऊरला महावितरणच्या कर्मचार्‍याला शिवीगाळ

सुरक्षा वाढविण्याची मागणी

गेल्या वर्षभरात कल्याणच्या बस आगारात चाेरीचे प्रकार वाढले आहेत.प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. सरकारी मालमत्तेसह प्रवाश्यांच्या जीवित व वित्ताच्या संरक्षणासाठी या आगारामध्ये पोलिसांसाठी स्वतंत्र चौकी असली तरीही पाकीटमाऱ्या आणि चोऱ्या काही केल्या थांबत नसल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बस आगारात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिस चौकी असताना चोरटे धाडस करत असल्याने प्रवाश्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे या बस आगारातील सुरक्षा वाढविण्याची मागणी प्रवाश्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button