नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील एक्साईज धोरणात बदल करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर झाला असला तरी या घोटाळ्याचे खरे सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत, असा आरोप भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज (दि. २०) पत्रकार परिषदेत केला. यावेळी ठाकूर यांनी सिसोदियांचा उल्लेख 'मनी..श' असा केला.
सीबीआयने मद्य धोरण घोटाळ्यात सिसोदिया यांना आरोपी बनविलेले आहे; पण केजरीवाल हे भ्रष्टाचाराचे खरे सूत्रधार असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले की, सीबीआयने घातलेल्या छाप्यांनंतर सिसोदिया यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले स्पष्टपणे दिसून येत आहे. पत्रकार परिषदेत सिसोदिया यांना पत्रकारांच्या प्रश्नांना धड उत्तर देता येत नव्हती. मद्य घोटाळ्याची चिंता करु नका, असे त्यांनी एका उत्तरात सांगितले. याचा अर्थ घोटाळा झाला असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मद्य धोरण जर योग्य होते, तर केजरीवाल सरकारने ते मागे का घेतले, हा प्रश्न आहे. धोरणातला घोटाळा उघडपणे दिसू लागल्यानेच संबंधित धोरण मागे घेण्यात आले होते, असा दावाही त्यांनी केला.
मद्य तयार करणाऱ्या कंपन्यांना मद्य विक्रीची परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल उपस्थित करुन ठाकूर म्हणाले की, 25 ऑक्टोबर 2021 रोजी अबकारी कर विभागाने काळ्या यादीत असलेल्या कंपन्यांची माहिती सांगितली होती. मात्र त्यानंतर कंपन्यांनाच मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली. मद्य माफियांचे 144 कोटी रुपये देखील माफ करण्यात आले. या सगळ्याचे उत्तर केजरीवाल यांना द्यावे लागणार आहे. मद्य विक्रेत्यांना इतकी सहानुभूती का दाखविली जात आहे. प्रश्नांपासून सिसोदिया दूर का पळत आहेत, हे जनता जाणून आहे. पत्रकार परिषदेला हजर असलेल्या दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेशकुमार गुप्ता यांनी मद्य विक्रेत्यांना लाभ पोहोचविण्यासाठी ड्राय डे बंद करण्यात आला असल्याचा आरोप केला.
हेही वाचा :