Thane : पिस्तूल बाळगून परिसरात दहशत पसरवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

Thane : पिस्तूल बाळगून परिसरात दहशत पसरवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथील ज्योतीनगर झोपडपट्टीतील जलकुंभा जवळ गुरुवारी (दि.२९ जुलै) रात्री साडे बारा वाजता पिस्तुल बाळगून परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका तरुणाला रामनगर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. महेश भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे (वय २८) असे या तरुणाचे असून हा अट्टल गुन्हेगार आहे. महेशने पिस्तुल, जिवंत काडतुसे कोठून आणले याचा तपास सुरू केला असून महेश विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस येण्यापूर्वीच रहिवासीयांनी या तरुणाला प्रसाद दिला होता. आरोपी जखमी असल्याने त्याला सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. (Thane)

अशी आहे घटना…

रामनगर पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत गस्त घातली जाते. पोलीस व्हॅन, दुचाकीचा यासाठी वापर केला जातो. पोलीस हे रामनगर पोलीस ठाणे हद्दीत रात्री १२ वाजता गस्त घालत असताना त्यांना आयरे गावातील ज्योतीनगर झोपडपट्टीत एक तरुण नागरिकांची झोपमोड करुन, शांततेचा भंग करुन आरडाओरडा करत असल्याचे कळविण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याच्या जवळ पिस्तूल असून कोणतीही दुर्घटना घडू शकते, अशी माहिती देखील त्यांनी दिली. गस्त घालणारे पोलीस तातडीने ज्योतीनगर झोपडपट्टीत गेले. तेथे त्यांना ५० हून अधिक रहिवासी जमावाने जमल्याचे दिसले. त्या गर्दीत एक तरुण बेभान होऊन आरडाओरडा शिवीगाळ करत होता. रहिवासी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तो त्यास दाद देत नव्हता. हा तरुण बेभान असल्याने तो ताब्यात येणार नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी वाढीव कुमक मागविली. पोलिसांच्या पथकाने या तरुणाला कसब लावून अटक केली. (Thane)

अंगझडती घेतेवेळी कमरेला होते पिस्तुल….

पोलिसांच्या पथकाने आयरे गाव शाळेजवळ तरुणाला कोंडीत पकडले. त्याला पोलीस व्हॅनमध्ये घातले. त्याची जमावा समोर अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तुल, दोन जिवत काडतुसे आढळली. पिस्तुल कोठुन आणले असे विचारले असता तरुण गांगरला. तरुणाने आपले नाव महेश भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे (२८, रा. ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टीकाजवळ, आयरेगाव, डोंबिवली पूर्व) असे सांगितले. (Thane)

हेही वाचलंत का?

Back to top button