राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसे यांची गिरीश महाजनांवर टीका | पुढारी

राजकीय सूडबुद्धीतून दूध संघावर कारवाई: एकनाथ खडसे यांची गिरीश महाजनांवर टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघात कर्मचारी भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, यासाठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेण्यात आली असून अद्याप कुठल्याही उमेदवारास नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे भ्रष्टाचार करण्याचा विषयच येत नाही. नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप किंवा चौकशी व्हायला हवी होती. मात्र अशी कुठलीही परिस्थिती नसताना दूध संघावर प्रशासक नियुक्त करणे म्हणजे ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईबद्दल खुलासा केला आहे. यावेळी माहिती देताना श्री. खडसे म्हणाले की, १९९५ मध्ये अवसायनात गेलेला दूध संघ आता भरभराटीस आला आहे. ५ कोटी वरून १५ कोटींवर भाग भांडवल गेले आहे. दररोज ५ लाख लिटर दूध प्रक्रिया, ३ लाख लिटर दूध पॅकिंग तसेच दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन पूर्ण केले जाते. त्यामुळे दूध संघाचा नफा देखील वाढला असून नव्याने ९१ कोटींची गुंतवणूक करून अद्यावत मशनरी कार्यान्वित करण्यात आली आहे. दूध संघची सुरू असलेली भरभराट पाहता येत नसल्याने गिरीश महाजन आणि एन. जे. पाटील यांनी तक्रार केली आहे. त्यांना दूध संघाच्या विकासाबाबत काही एक घेणे देणे नसून तूप, लोणी याच्यावरच त्यांचा डोळा असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली.

एन. जे. पाटील यांना बडतर्फ केले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणारे एन. जे. पाटील यांनी दूध संघाच्या अहिताचे काम केल्याने तसेच बेशिस्त वागण्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करीत असतात. अशा व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणे कितपत योग्य आहे, असा सवाल श्री खडसे यांनी उपस्थित केला आहे.

सहकार कायद्यानुसार संचालक मंडळ निवडणुका पार पडेपर्यंत कायम राहील. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही ठपका नाही, तसेच कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत असे असले तरी चौकशी न करताच दूध संघावर प्रशासक नियुक्त करणे यातून राजकीय हेतू स्पष्ट होत आहे. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, सोमवारी निर्णय येणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाही

दूध संघाच्या चौकशी समितीत सर्व राजकीय व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठल्याही शासकीय अधिकारी किंवा सहकार क्षेत्रातील जाणकार यात नाही. यावरूनच त्यांचा कुत्सित हेतू दिसून येतो. प्रशासक नियुक्तीबाबत डीडीआरच्या माध्यमातून कुठलेही अधिकृत आदेश दूध संघाला प्राप्त झालेले नाही, अशीही माहिती खडसे यांनी दिली.

Back to top button