कल्याण-डोंबिवलीत धुवाँधार पाऊस | पुढारी

कल्याण-डोंबिवलीत धुवाँधार पाऊस

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या धुंवाधार पावसाने कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली. तर किनारपट्टी भागात भराव टाकून त्यावर बांधलेल्या बैठ्या चाळींतील रहिवाश्यांची पावसाच्या पाण्याने दाणादाण उडवून टाकली. कल्याण पूर्व भागातील मलंगगड रोडला असलेल्या अडिवली-ढोकळी परिसरात अनेक वर्षापासून नाल्याचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून केले जात नसल्याने या भागात पाणी तुंबून जवळपास 400 कुटुंबीयांचा फटका बसला आहे. रात्रभर रहिवासी घरात घुसलेले पुराचे पाणी बाहेर काढण्याचे काम करत होते. यामध्ये वृद्ध आणि लहान मुलांची सर्वाधिक अबाळ झाली.

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली, आटाळी, आदी परिसरातील अनेक भागात रात्री पाणी तुंबले होते. कल्याण पूर्वेत चिंचपाडा भागात हीच परिस्थिती होती. कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या अडिवली-ढोकळी भागात गेल्या सात वर्षात बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या भागातील मोकळ्या जमिनी, नैसर्गिक स्त्रोत बांधकामांमुळे माफियांनी बुजविले. या भागातील नाला अरुंद आहे. वाढत्या वस्तीमुळे सांडपाणी वाढले आहे. हा नाला रुंद करा म्हणून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील गेल्या पाच वर्षापासून पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. नगरसेवक पाटील यांच्या प्रयत्नाने या भागात एक कोटी 75 लाख रुपये नाला विस्तारीकरण कामासाठी प्रशासनाने मंजूर केले होते. या कामाच्या निविदा प्रक्रिया पालिकेने पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे हे काम रेंगाळले. त्याचा फटका आता रहिवाशांना बसत आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोडला असलेल्या स्वामी समर्थ मठ परिसरात गुडघाभर पाणी तुंबल्याने या भागातून रिक्षा वा अन्य वाहने चालविणे चालकांना अवघड झाले होते. येथे नाले आणि गटारांचे मार्ग बुजवून त्यावर माफियांनी इमारती उभारल्या आहेत. त्याचा तडाखा रहिवाशांना बसत असतो. डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक भागातील अरुंद भुयारी नाल्यातील सेवा वाहिन्यांच्या गुंतागुंतीमुळे मुसळधार पावसात पाटकर रस्ता परिसर जलमय झाला होता.

देवीचा पाडा भागात मुसळधार

पश्चिम डोंबिवलीतल्या महाराष्ट्र नगर, देवीचा पाडा भागात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले होते. सोमवार-मंगळवारच्या रात्री मनसेचे शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पावसाची तमा न बाळगता या भागातील बैठ्या चाळींत राहणार्‍या रहिवाश्यांना मदतीचा हात दिला. आस्मानी संकटात सापडलेल्या या भागातील रहिवाश्यांच्या घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. या तक्रारी वाढल्याने रमा म्हात्रे यांनी महावितरणशी संपर्क साधून कर्मचार्‍यांमार्फत दुरुस्त्या करून घेतल्या.

डोंबिवलीच्या निवासी विभागात 18 तास बत्तीगुल्ल

एमआयडीसीच्या निवासी विभागात सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खंडीत झालेला वीज पुरवठा दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. त्यामुळे या भागातील रहिवाश्यांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारे रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यातच मंगळवारी पाणी पुरवठा देखिल बंद राहणार असल्याचे एमआयडीसीने कळविल्याने रहिवाश्यांच्या संतापात अधिक भर पडली.

सत्तासंघर्षात लोकप्रतिनिधी व्यस्त

कल्याण-डोंबिवलीतील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात व्यस्त असल्याने या समस्यांमध्ये लक्ष घालण्यासाठी कुणीही वाली नसल्याने सर्व रहिवाश्यांनी आपला राग समाजमाध्यमांद्वारे काढला. त्यातच जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने आणि रस्त्यांची दुर्दशा झाल्याने आता कुणाकडे जायचे? की आपणच बाहेर पडून आंदोलन मार्गाने समस्या सोडवायच्या? असे रहिवाश्यांना वाटू लागले आहे. रात्रभर वीज नसल्याने आणि त्यातच आता पाणी पुरवठा बंद झाल्याने हतबल झालेल्या रहिवाश्यांनी समाज माध्यमांद्वारे प्रशासनावर हल्लाबोल चढवला होता.

Back to top button