डोंबिवली : सहा वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू | पुढारी

डोंबिवली : सहा वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा : बाळा मी तुला मारणार नाही, ओरडणार नाही, पण तू परत ये, असे शब्द होते, आजूबाजूच्या शेजारच्यांचे. एका सहा वर्षीय मुलाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून गेला.

डोंबिवलीतील सगरली येथील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा वेदांत जाधव हा सहा वर्षांचा मुलगा एका अनधिकृत इमारतीतील लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू पावला. मात्र, त्याचा सांभाळ आजी, आजोबा, बाबा, यांच्या व्यतिरिक्त आजूबाजूला राहणारे शेजारी करत होते. नेहमीच वेदांत या इमारतीमध्ये खेळण्यासाठी जात असे. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता वेदांत बराच वेळ झाला तरी सापडेना. शोधाशोध केल्यानंतर थोड्यावेळाने लिफ्टच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह दिसला. या खड्ड्यात पडलेला बॉल काढण्यासाठी हा मुलगा त्या खड्ड्यात गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे.

अनोखे प्रेम आणि नाते

या मुलाच्या शेजारी अवंतिका महाडिक आणि इला महाडिक राहतात. अवंतिका यांचा वेदांतवर अत्यंत जीव होता. त्याचे लाड पुरवणे, त्याला खाऊ देणे, ओरडणे, अभ्यास घेणे, या सर्व गोष्टी अवंतिका करत होत्या.

महापालिका नेमकी काय करते ?

या आधी देखील अशाच प्रकारे अनधिकृत इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून एक मुलगा दगावल्याची घटना सागाव येथे घडली होती. मात्र, त्यानंतर देखील महापालिका प्रशासन ढीम्म असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. ज्या इमारतीच्या खड्ड्यात पडून वेदांत गेला. त्या इमारतीचे २०१२ पासून बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हे सगळं कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button