औरंगाबाद: संभाजीनगर’चा निणर्य केंद्रच घेणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड | पुढारी

औरंगाबाद: संभाजीनगर’चा निणर्य केंद्रच घेणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर करणे तसेच विकास मंडळांचे पुनर्गठण करणे हे महाविकास आघाडी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचे श्रेय शिवसेनेने लाटू नये. केंद्र सरकारच ‘संभाजीनगर’वर शिक्‍कामोर्तब करणार आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (दि.3) येथे सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कराड म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पक्षात फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत जाता जाता औरंगाबाद शहराचे संभाजीनगर
नामकरण करण्याचा तसेच मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र या विकास मंडळांचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. 39 आमदार फुटल्यानंतर आता सरकार
वाचणार नाही हे लक्षात आल्यानंतरच ‘संभाजीनगर’चा निर्णय घेण्यात आला.

आम्ही या निर्णयाचे स्वागतच करतो.’औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्याच्या प्रस्तावावरील कायदेशीर बाबींची नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्तता करतील. त्यानंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठविला जाईल. कोणत्याही शहराचे नाव बदलण्याचे अधिकार केंद्र सरकारचे असतात. राज्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून, शिवसेनेने ‘संभाजीनगर’चे श्रेय लाटू नये, असा टोला डॉ. कराड यांनी लगावला.

पक्षी अभयारण्य असलेल्या जायकवाडी धरणात विहीर खोदण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची तब्बल अडीच वर्षांनंतर परवानगी मागण्यात आली. ही परवानगी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजनेला वेग देण्यासाठी पुढील आठवड्यात मनपा, जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिपदासाठी पाचही आमदार इच्छुक एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार अतुल सावे हे फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. सावे यांच्याबरोबरच ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब हे भाजप आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. याशिवाय शिवसेनेचे बंडखोर आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल यांनीदेखील आपणाशी संपर्क साधून मंत्रिपदासाठी शब्द टाकण्याची गळ घातली आहे. मात्र, मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागेल हे सांगता येत नाही. वरिष्ठ पातळीवरूनच हा निर्णय घेतला जाईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

Back to top button