ठाणे जिल्ह्यात भाजपची स्वबळाची तयारी सुरूच | पुढारी

ठाणे जिल्ह्यात भाजपची स्वबळाची तयारी सुरूच

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने भाजपने राज्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करून गेल्या सहा महिन्यापासून बूथ स्तरावर काम सुरू केले आहे. आता शिवसेनेतून बंड करीत ठाण्याचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपसोबत सरकार बनविले आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीत ठाणे भाजपने ठाणे, कल्याणसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका हद्दीतील 3600 बुथवर कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावले आहे. शिवसेना शिंदे गटासोबत भाजप सत्तेत सामील असताना ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीला स्थानिक भाजप नेतृत्व लागल्याने भाजप कार्यकर्त्यांसह शिवसेना बंडखोर गटातील सैनिकांची अस्वस्थता वाढली आहे.

गेली अडीच वर्ष शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरातील निवडणुका लढवून भाजपला धोबीपछाड करण्याचा सपाटा लावला. त्यातून भाजपने आक्रमक पवित्रा घेत शत प्रतीशत नारा देऊन बूथ स्तरावर काम सुरू केले. गेल्या सहा महिन्यांपासून स्वबळाचा नारा देत वॉर्ड निहाय उमेदवार शोधून कामाला लागले आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे जिल्हा आघाडीवर आहे. मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी त्यांची ताकद पाहता भाजपच्या नेत्यांनी कमजोर बूथ शोधून तिथे काम सुरू केले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील बूथ निहाय रणनीती आखली आहे. आमदार संजय केळकर यांना अगोदर पालघर आणि कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे.

ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदार संघाची बांधणीचे काम सुरू झाले आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिका निवडणुका पुढे गेल्या आहेत. त्याचा फायदा उचलत भाजपने स्वबळाचा नारा देत संघटन मजबूत करण्यावर वर दिला आहे. एकट्या ठाण्यात 1200 बूथ असून त्यातील 250 बूथ वर भाजपची ताकद नगण्य असून त्याची कारणे शोधून कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.

बैठकीत बूथस्तरावर काम करण्याचे आदेश

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड करून महाविकास आघडीचे सरकार पाडले. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. आमचीच खरी शिवसेना असे अभिनंदनाचे फलक शिंदे समर्थकांनी ठाण्यात लावले आहेत. मात्र शिवसेनेचे धनुष्यबाण हे निशाणी म्हणून मिळाली नाही तर काय होणार ही धास्ती शिंदे समर्थकांना लागली आहे. अशा बदलल्या राजकीय परिस्थितीत ठाणे भाजपच्या जिल्हा कार्यकारणीची शनिवारी बैठक झाली आणि स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी बूथ स्तरावर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सेनेचे इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक यांच्यात अस्वस्थता

ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली निवडणूक स्वबळावर लढवून ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहकार्य केले आहे. त्यांनी शिंदे यांना न दुखावता मैत्री जपली होती. त्या मैत्रीतून आज शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आलेले आहे. मात्र मूळ शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते हे शिंदे गटासोबत नसल्याचे विजयी जल्लोषात सामील झालेल्या नगण्य उपस्थितीतून दिसून येते. एकीकडे कट्टर शिवसैनिक हे अजूनही शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे आले नसताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही असे ठणकावून सांगितल्याने शिंदे समर्थक तसेच इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक यांचात अस्वस्थता पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याने शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

गेल्या सहा महिन्यापासून स्वबळाचा नारा देऊन पक्षाने बूथ सक्षमीकरणासाठी काही कार्यक्रम आखला आहे. त्याचा भाग म्हणून शनिवारी ही बैठक झाली. 1200 बूथ पैकी 250 बूथ वर अधिक लक्ष देऊन शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट गाठण्यासाठी काम सुरू आहे. बदललेल्या राजकीय स्थिती आणि संघटनात्मक काम यावर परिणाम होत नाही.
-संजय केळकर, आमदार

Back to top button