मस्जिदमध्ये चोर्‍या करणारा अटकेत | पुढारी

मस्जिदमध्ये चोर्‍या करणारा अटकेत

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई, ठाण्यातील मस्जिदमधल्या दानपेटीतील रोकड व नमाज पठण करणार्‍यांचे मोबाईल पळवणार्‍या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. सदर कारवाई आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांनी केली. हा आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील 10 गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपीकडून मोटारसायकल, दानपेटी व 15 मोबाईल असा एकूण 1 लाख 31 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केल्याचे पोलिसांनी दै. पुढारीला सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मस्जिदमध्ये वारंवार चोर्‍यांच्या घटना घडू लागल्या. या घटनांमुळे मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी पसली. सदर बाब लक्षात घेऊ न वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आरोपींचा तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाणयाचे वपोनि कुमुद कदम, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि खरे, अण्णासाहेब गादेकर हे पोलीस पथकासह आरोपीचा शोध घेऊ लागले. मस्जिद परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी बोरिवलीतील नॅशनल पार्क येथे असल्याची माहिती तपासी पोलीस पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी हुसेन आरीफ साजिद हुसेन (42) याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने मुंबई, ठाण्यात चोर्‍या केल्याची कबुली दिली.

या गुन्ह्यांची उलगडा

हुसेन हा सराईत आरोपी असून त्याच्या अटकेमुळे आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातील 3 तर चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले 2 गुन्हे, धारावी, विक्रोळी, घाटकोपर, खोपोली, वर्तक नगर पोलीस ठाण्यांतील प्रत्येक एक असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. हुसेन याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Back to top button