एकनाथ शिंदे यांच्या रूपाने लाभला ठाणे जिल्ह्याला पहिला मुख्यमंत्री | पुढारी

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने लाभला ठाणे जिल्ह्याला पहिला मुख्यमंत्री

ठाणे : दिलीप शिंदे
राज्य सरकार बनविण्याची आणि बिघडविण्याची ताकद असलेल्या ठाणे जिल्ह्याला नामदार एकनाथ शिंदे यांच्या रूपाने पहिले मुख्यमंत्री लाभले आहे. तर शिंदे हे कोकणातील सहावे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी फक्त कॅबिनेट मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री आणि दोनदा विरोधी पक्ष नेतेपद हे ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला आले होते.

अठरा आमदार असलेल्या ठाणे जिल्ह्याला कधीच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. शिवसेनेला पहिली सत्ता देणार्‍या आणि रामभाऊ म्हाळगी यांना संसदेत पाठविणार्‍या ठाणे जिल्ह्याकडे नेहमीच केंद्र तसेच राज्याच्या नेतृत्वाने दुय्यम स्थान दिले होते. कृष्णाराव धुळप यांच्या रूपाने पहिला विरोधीपक्ष नेता हा ठाणे जिल्ह्याला मिळाला. 1962 ते 1972 या दरम्यान विरोधी पक्ष नेतेपद सांभाळणारे धुळप हे कल्याण विधानसभेतून निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसचे शांताराम घोलप यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली. राज्यात शिवसेना भाजपचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याला सन्मान मिळाला. भाजपचे जगन्नाथ पाटील आणि शिवसेनेचे साबीर शेख, गणेश नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुन्हा गणेश नाईक यांना संधी मिळत गेली. काही काळ जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. विष्णू सावरा आणि राजेंद्र गावित या पालघर जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि कल्याणचे माजी खासदार रामभाऊ कापसे यांची नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी ठाणे आणि पालघर जिल्हा एकत्रित होते. आता विभाजन होऊन ठाणे 18 आणि पालघर 6 असे 24 आमदार आणि चार खासदार निवडून येतात. ही ताकद राज्यातील सरकार बनविण्यासाठी आणि पाडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते हे आता सिद्ध झाले आहे.

भाजप शिवसेना युतीच्या काळात ठाणे जिल्ह्याला चांगले दिवस येतातं हे पुनः एकदा दिसून आले आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेटपद दिले होते. सिडकोचे अध्यक्षपद ही ठाण्याकडे अनेक वर्ष होते. सत्ता संघर्षातून मागील सरकारमध्ये शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे नाही असे निश्चित केल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी ही ठाण्याचे एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली. महिनाभराच्या कालावधीत विरोधीपक्षनेता म्हणून शिंदे यांनी प्रभावीपणे काम केले आणि शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. त्यावेळी शिंदे आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत काम करताना शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात वेगाने शिरकाव केला. त्याचा प्रभाव आज दिसून आला आहे. त्याच वेळी केंद्रात कपिल पाटील यांना भाजपने राज्यमंत्री पद देऊन ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा संधी दिली.
मुख्यंमत्री पदावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दुसर्‍या क्रमांकाचे मंत्रिपद देण्यात आले. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही दुसर्‍यांदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडे असणारे नगरविकास खाते हे दुसर्‍यांदा मंत्री बनलेल्या शिंदे यांच्याकडे देण्यात आले. त्यांना शिवसेना गटनेता म्हणून निवडण्यात आले. अशा या नेत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तब्बल 50 आमदारांना सोबत नेऊन महाविकास आघाडीच्या विरोधात 21 जूनला बंड पुकारले आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचे सरकार कोसळले. एवढ्या मोठयाप्रमाणावर आमदारांना फोडण्याची किमया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील करता
आली नव्हती.

शरद पवार हे 1978 मध्ये 46 आमदारांना घेऊन रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसच्या आघाडीतून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना बाहेर पडले आणि मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार कोसळले. त्यावेळी चार मंत्री त्यांच्या सोबत होते. त्यानंतर 38 व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री बनले. इतिहासाची पुनरावृत्ती 40 वर्षानंतर झाली आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 50 पेक्षा अधिक आमदार हे सरकारमधून बाहेर पडले आणि मुख्यमंत्र्यांपदी विराजमान झाले. अशा प्रकारे ठाण्याला मुख्यमंत्रीपदाचा पहिल्यांदाच बहुमान मिळविला. ही किमया एकाद्या जादूगाराप्रमाणे शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन केलेली आहे.

कोकणाचे सहावे मुख्यमंत्री

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे कोकणातील पाचवे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी सिंधुदुर्गचे पी के सावंत, रायगड जिल्ह्यातील ए.आर. अंतुले, सिंधुदुर्गमधील नारायण राणे आणि मुंबईतील मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

Back to top button