ठाणे : रानभाज्या बहरल्या; आदिवासींना पावसाळी रोजगार | पुढारी

ठाणे : रानभाज्या बहरल्या; आदिवासींना पावसाळी रोजगार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या रानभाज्या बहरल्या आहेत. विविध जीवनसत्त्वे व पोषक घटक आहेत. त्यात कटूर्ल, भारंगा, शेवगा, लाल माठ, यासारख्या अनेक भाज्यांचा समावेश आहे. नागरिकांना राजभाज्यांचे महत्त्व कळल्याने आता नागरिकांचा कल या भाज्यांकडे वळला आहे. या रानभाजी व्यवसायातून आदिवासींसह महिला वर्गाला पावसाळ्यात रोजगार प्राप्त होत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर नैसर्गिकरीत्या शेताच्या बांधावर व रानावनात उगवणार्‍या या रानभाज्यांची ग्रामीण भागातील नागरिकांना ओळख आहे. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उगवतात. श्रावणात तर या भाज्यांना बहर येतो. राजभाज्या नैसगिकरीत्या उगवत असल्याने त्यावर इतर पालेभाज्यांप्रमाणे कोणतेही विषारी कीटकनाशक, रासायनिक खत यांचा एक कणभरही अंश नसतो. रानभाज्या विषमुक्त असून, रोगमुक्तही आहेत. त्यामुळे गावगवात पावसाळ्यात घराघरात रानभाज्यांना जास्त मागणी असते.

पावसाळा सुरू झाला की हमखास मिळणारे रानफळ म्हणजे अळू. सध्या बाजारात अळू विक्रीसाठी आले आहेत. पाच अळूचा वाटा 20 रुपयांना मिळत आहे. आदिवासी महिला ही अळूची फळे विक्रीसाठी घेऊन येतात. साधारण पाऊस पडण्याआधी ही फळे तयार होतात आणि पावसाळा सुरू झाला की विक्रीसाठी येतात. फक्त याच हंगामात मिळणारी चॉकलेटी रंगांची, गोल आकाराची आवळ्या एवढी ही आंबट गोडफळे अनेकांना आवडतात. त्यामुळे आवर्जून त्याची खरेदी केली जाते.

Back to top button