मिरा-भाईंदरचा धुरा गिल्बर्ट मेंडोसांवर? | पुढारी

मिरा-भाईंदरचा धुरा गिल्बर्ट मेंडोसांवर?

मिरारोड : पुढारी वृत्तसेवा मिरा-भाईंदर शिवसेना पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी काही महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. रविवारी मिरा-भाईंदरच्या नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी या बैठकीत मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरा भाईंदरमध्ये नव्या पदाधिकार्‍यांची लवकरच निवड केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी गिल्बर्ट मेंडोसांना दिली जाणार असल्याची शक्यता आहे. भाईंदर पश्चिम येथे काही महिन्यांपूर्वी शिवसेना कार्यकर्ते यांनी शहर प्रमुखाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर शहरातील पदाधिकारी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून कोणत्याही पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीकरण्यात आल्या नव्हत्या. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत काही आमदारासह गुवाहाटी येथे गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाणे व आसपासचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा व बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मिरा-भाईंदरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक रविवारी सायंकाळी मातोश्रीवर घेण्यात आली. यावेळी, पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांना सांगून देखील विविध कामे होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. यासह सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे वारंवार शिवसेनेच्या नगरसेवकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही काही नगरसेवकांनी सांगितले. काही पदाधिकार्‍यांनी माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांच्यावर शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी देण्याची मागणीदेखील केली. त्यावेळी मेंडोसा यांच्यावर देखील पक्षाची जबाबदारी देण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मिरा-भाईंदर महापालिकेवर येत्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्या पद्धतीने कामाला लागा पदाधिकार्‍यांमधील आपापसातील वाद विवाद मिटवा व एकत्र काम करा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. शहराची नवीन कार्यकारिणीची निवड करायची असल्याने कार्यकर्त्यांची यादी द्या, येत्या काही दिवसांत कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे ठाकरे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले. यावेळी लवकरच मिरा-भाईंदर शहराचा दौरा केला जाईल व त्याला मी स्वतः हजर राहील असे ठाकरे यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती शिवसेना
नगरसेवकांनी दिली आहे.

Back to top button