बँकेचे लॉकरदेखील आता सुरक्षित नाही ; बँकेतून दागिने लंपास | पुढारी

बँकेचे लॉकरदेखील आता सुरक्षित नाही ; बँकेतून दागिने लंपास

उल्हासनगर पुढारी वृत्तसेवा : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक महिला बँक ग्राहकाने बँकेच्या लॉकरमध्ये लाखो रुपयांचे दागिने ठेवले होते, मात्र बँक मॅनेजरनेच लॉकर तोडून महिलेचे दागिने चोरी केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी बँक मॅनेजरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोमा कमलकुमार आस्कनानी (53) ही महिला कल्याण (प) येथील गोदरेज हिल रोड परिसरात असलेल्या एस्टरडेल या इमारतीत राहतात. उल्हासनगर कॅम्प 3 मधील फर्निचर मार्केटजवळ वूडलँड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये त्यांचे खाते आहे. रोमा यांनी 23 मार्च रोजी बँकेच्या लॉकरमध्ये 7 लाख 77 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले होते. याची लेखी नोंद व पुरावेही त्यांच्याकडे आहेत.

काही दिवसानंतर रोमा या त्यांचे दागिने परत घेण्यासाठी आल्या असता लॉकर अगोदर उघडलेला होता व त्यामधून दागिने गायब झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. या घटनेमुळे चिंताग्रस्त झालेल्या रोमा यांनी बँकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचारी व अधिकार्‍यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे शेवटी त्यांनी बँकेचे मॅनेजर मयूर माणीकराव ठेले (36) यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी काही दिवसांची मुदत मागून रोमा यांना तुमचे दागिने परत मिळतील, असे आश्वासन त्यांना दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून रोमा या त्यांच्या दागिन्यांबाबत चौकशी करीत होत्या आणि या संदर्भात त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सुद्धा तक्रारी केल्या होत्या.

दागिने चोरी केल्याचे निष्पन्न

शेवटी त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली असता पोलीस तपासात बँक मॅनेजर मयूर माणीकराव ठेले याने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशांचे पालन न करता रोमा यांचे बँकेतील लॉकर तोडून त्यातील 7 लाख 77 हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी ठेले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे हे करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button