बेळगाव हादरले! नाल्यात प्लास्टिक बरण्यांंमध्ये आढळली ७ मृत अर्भके | पुढारी

बेळगाव हादरले! नाल्यात प्लास्टिक बरण्यांंमध्ये आढळली ७ मृत अर्भके

गोकाक, बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; गोकाकपासून जवळ असणार्‍या आणि तालुक्याचे ठिकाण असणार्‍या मुडलगी येथील बसस्थानकाशेजारी एका नाल्यामध्ये प्लास्टिक बरण्यांंमध्ये बंद करून फेकण्यात आलेली सात अर्भके सापडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तपासासाठी आरोग्य विभागाने विशेष पथक स्थापन केले आहे. मृत अर्भके स्त्री की पुरुष जातीची, हे निश्‍चित झालेले नाही. मुडलगी शहराच्या मध्यभागातून एक नाला वाहतो. या नाल्यामध्ये अर्भकांना प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये बंद करून फेकून देण्यात आलेले दिसते. पाण्यासोबत बरण्या वाहत आल्या आणि बसस्थानकाशेजारी असणार्‍या पुलाखाली नाल्याच्या काठावर आढळून आल्या. काही लोकांनी या बरण्या पाहून घटनेची माहिती मुडलगी पोलिसांना दिली.

पाच डब्यांमध्ये 7 अर्भके आहेत. ही अर्भके कोणी व केव्हा टाकली आहेत, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. लिंगनिदान करण्याच्या उद्देशाने गर्भपात करण्यात आल्याचा संशय व्यक्‍त केला जात आहे. काही अर्भके पाच महिन्यांची, तर काही सात महिन्यांची असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरली, बसस्थानकाशेजारी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मुडलगी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन अर्भके ताब्यात घेतली. घटनेची माहिती समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी भेट देऊन पाहणी केली.

अज्ञातांविरुद्ध लिंगनिदान आणि भ्रूणहत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच बिम्सच्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात येईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
– डॉ. महेश कोणी,
जिल्हा आरोग्य अधिकारी

अर्भके 5 आणि 7 महिन्यांची
सात अर्भकांपैकी काही अर्भके पाच महिन्यांची, तर काही अर्भके सात महिन्यांची आहेत. मृत अर्भके मुडलगी तालुका रुग्णालयात ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती फॉरेन्सिक प्रयोगशाळेला पाठवण्यात आली आहेत. ती स्त्री-जातीची की पुरुष जातीची हे फॉरेन्सिक तपासणीनंतरच निश्‍चित होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी दिली.

Back to top button