मराठा आरक्षणासाठी निश्चित तारीख सांगता येणार नाही : चंद्रकांत पाटील | पुढारी

मराठा आरक्षणासाठी निश्चित तारीख सांगता येणार नाही : चंद्रकांत पाटील

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची लोकसंख्या साडेबारा कोटी आहे. यात तीन कोटीहून अधिक मराठा समाजाची संख्या आहे. त्यामुळे आरक्षणाच्याद़ृष्टीने माहिती गोळा करायला वेळ लागेल. त्यासाठी निश्चित तारीख सांगता येणार नाही. कदाचित एक वर्षाचाही वेळ लागू शकतो, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले की, मराठा समाज मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय अधिवेशन बोलवता येणार नाही. प्रत्येक गोष्ट व्हायला वेळ लागते. 2014 ते 2019 काळात मी हा प्रश्न जवळून हाताळला होता. त्यावेळी मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला एक वर्षाचा कालावधी लागला होता. त्यामुळे तो अहवाल हायकोर्टात टिकला. मात्र सुप्रीम कोर्टात प्रभावीपणे न मांडता आल्याने तो टिकला नाही. यावेळेस हायकोर्टात आरक्षण टिकणारा अहवाल द्यावा लागणार आहे. याकरिता वेळ लागणार असल्याचे सांगत आरक्षण मागणीसाठी निश्चित तारीख देऊन अडून बसून चालणार नाही.

महाराष्ट्रात लोकसभेला महायुतीला किमान 45 जागा मिळतील. त्याखाली जागा येऊच शकत नाहीत. विरोधी गटाला केवळ तीन जागा मिळतील. राज्यात एक सायलेंट व्होटर आहे. ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा फायदा झाल्याचा दावाही पाटील यांनी केला. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.

Back to top button