सोलापूर : नातीवर अत्याचार करणा-या ६४ वर्षीय नराधमास ७ दिवसांची पोलिस कोठडी  | पुढारी

सोलापूर : नातीवर अत्याचार करणा-या ६४ वर्षीय नराधमास ७ दिवसांची पोलिस कोठडी 

करमाळा; पुढारी वृत्तसेवा :  करमाळा तालुक्यात एका गावातील घृणास्पद व नात्याला काळीमा फासणा-या घटनेतील ६४ वर्षीय नराधमास ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बार्शी सेशन कोर्टातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल एस चव्हाण यांनी पोलिस कोठडी सुनावली आहे.

आपल्या अल्पवयीन चुलत नातीशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून तिला गर्भवती करण्याचा प्रकार एका वृध्दाने केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. यामध्ये करमाळा पोलिसांनी तातडीने दखल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेला संशयित आरोपीस अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या होत्या.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील एका  १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस या नराधमाने उन्हाळी सुट्टीत अल्पवयीन नातीवर जबरदस्ती केल्याचे तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे. घरात एकटी असल्याचे पाहुन या वृद्ध व्यक्तीने तिच्यासोबत जबरदस्ती केली. तसेच पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या घटनेनंतर या वृद्ध आरोपीने अनेक वेळा या नातीवर जबरदस्तीने अत्याचार  केला. दरम्यान पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर हे प्रकरण तिने तिच्या आईला सांगितले. यावेळी आजोबाने हा प्रकार जबरदस्तीने केल्याचे उघडकीस आले. यावेळी पिडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली.

हा प्रकार साधारण मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घडला होता. यावेळी आई-वडील मजुरी करण्यास गेल्याचा गैरफायदा या आजोबाने घेऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. याची फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, हवालदार संतोष देवकर, मेजर आनंद पवार यांनी पळून जाणा-या आजोबांला बेड्या ठोकल्या.

संबंधित वृद्ध व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून बार्शी सत्र न्यायालयातील सत्र न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान या गुन्ह्याचा  सहाय्यक  पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे पुढील तपास करीत आहेत.

नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

संबंधित संशयित आरोपीला जेरबंद केलेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नात्याला काळीमा फासणा-याला कडक शासन झाले पाहिजे अशी मागणी नागरिकांना केली आहे. विशेष म्हणजे मणीपूर येथील विवस्त्र महिलांची धिंड काढून संस्कारक्षम  देशाची मान खाली घालायला लावलेल्या घटनेचा करमाळा तहसिल कार्यालयासमोर महिला अत्याचार विरोधी कृती समिती च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या अॅड सविता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय महिला व सामाजिक व राजकीय पक्षांच्या वतीने निषेधार्थ अंदोलन करण्यात आले होते. अंदोलना नंतर अवघ्या तासाभरातच ही घृणास्पद घटना समोर आल्याने नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या आरोपीस कडक शासन न झाल्यास मोठा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Back to top button