सोलापूर : चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा घालणा-या चौघाविरूध्द गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा घालणा-या चौघाविरूध्द गुन्हा दाखल

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : चारधाम यात्रा घडवून आणतो म्हणून पुणे येथील ट्रॅव्हल्स कंपनीच्या चार संचालकानी करमाळा येथील 50 भाविकांना तब्बल साडे बारा लाख रुपयाचा गंडा घातला. आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी आज (दि. ५) चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत भंडाळे, ऋषिकेश भंडाळे, सुप्रिया भंडाळे सर्व राहणार धायरी जिल्हा पुणे व बालाजी सूर्यवंशी (रा वडगाव बु तालुका हवेली जिल्हा पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याची फिर्याद प्रफुल्ल प्रदिप शिंदे (वय 33 रा.किल्ला वेस करमाळा) यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, करमाळा येथील काही भाविकांनी चारधाम यात्रा करण्याचे नियोजन केले होते. यामध्ये तब्बल ४७ भाविकांनी पुणे येथील ड्रीम कस्टर टूर्स ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्स कंपनीच्या फेसबुकवरील माहितीवरुन सहलीचे नियोजन केले. यामध्ये ट्रॅव्हल कंपनीचे संचालक संकेत भंडाळे, ऋषिकेश भंडाळे, सुप्रिया भंडाळे (सर्व रा. धायरी, जि. पुणे) व बालाजी सूर्यवंशी (रा. वडगाव बु. तालुका हवेली जि. पुणे) याच्यांशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क केला. या आयोजकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये प्रवास खर्च सांगून पुणे ते चारीधाम ठिकाणी यात्रा करण्याचे ठरवले होते. यामध्ये दहा दिवस व अकरा रात्री असा प्रवास निश्चित करून प्रवासातील सर्व खर्च ट्रॅव्हल  कंपनीने करण्याचे ठरले होते.

यामध्ये पुणे ते दिल्ली असा विमानाने प्रवास करण्याचे ठरले होते. हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ असा प्रवास ठरलेला होता. याबाबत ४७ भाविकांनी ११ लाख ७५ हजार रुपये या कंपनीकडे भरले होते. त्यानंतर संशयितांनी खराब हवामानासह विविध कारणे भाविकांना देऊन ही यात्रा रद्द केली. त्यानंतर ७ मे २०२३ रोजी १५ दिवसात तुमचे पैसे माघारी देतो, असे सांगितले होते. सर्वांचा विश्वास संपादन केला होता. मात्र त्यांना पैसे परत दिले नाहीत.

50 भाविकांनी 5 जुन रोजी करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी आषाढी वारीचे कारण देत गुन्हा दाखल केला नसल्याचे भाविकांनी सांगितले. तब्बल महिना उलटून गेल्यानंतर आज (दि. ५) करमाळा पोलिसात चार ही संशयित आरोपींच्या विरोधात भादवी 420/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक प्रविण धर्मा साने हे पुढील तपास करीत आहेत .

Back to top button