ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥ | पुढारी

ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥

सतीश मोरे

उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह अन्य राज्यातील विठ्ठल भक्त पंढरीत आले आहेत. संतभूमी असलेल्या राज्यातील सुमारे 100 पालख्या, राज्याच्या कानाकोपर्‍यातून दाखल झालेल्या लहान – मोठ्या दिंड्या चंद्रभागा तीरी वसलेल्या पंढरीत आल्या आहेत. गुरुवार, 29 जूनला एकादशी दिवशी पालखी सोहळ्यातील नगरप्रदक्षिणा होणार आहे. यावेळी वारीत सहभागी हजारो वारकरी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन पंढरीला नगरप्रदक्षिणा घालत पांडुरंगाचे दर्शन घेतात.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्ती, संत मुक्ताई, संत सोपानकाका, संत गाडगेबाबा, संत चोखोबा यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या सुमारे शंभर संत महात्म्यांच्या मुख्य पालख्या पंढरीत पोहोचल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या दिशांनी, मार्गाने, विविध भागांतील गावोगावच्या हजारो लहान – मोठ्या दिंड्या चंद्रभागा तीरी दाखल झाल्या आहेत. लाखो भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पंढरीत जिकडे – तिकडे वैष्णवजन दिसत आहेत. नामसंकीर्तन जयघोष सुरू असून, संताच्या पालखी मंदिरात विसावल्या. तर मठात, मंदिरात, धर्म शाळेत, कोणाच्या तरी घरात, चंद्रभागा तिरी, रस्त्याकडेला जिथे जागा मिळेल, तेथे वारकरी मुक्कामास आहेत. रात्री बारा वाजता एकादशी सुरू झाल्यानंतर वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी मोठी गर्दी करतात. तत्पूर्वी बुधवारीही हेच चित्र पाहावयास मिळत होते. स्नानानंतर हजारो वारकरी माऊली नित्यनेम पूजा करताना पहावयास मिळत होते. आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून विविध गावच्या पायी दिंडी सोहळ्यातून आलेले वारकरी आणि पायी वारी शक्य न झालेले लाखो वारकरी मिळेल त्या वाहनांमधून पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. नाथ चौकातील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात माऊली पालखी होती. गुरुवारी एकादशी दिवशी रथामध्ये माऊली पादुका ठेवल्यानंतर नगर प्रदक्षिणा सुरू होणार आहे. माऊली पालखी मागोमाग संत तुकाराम, निवृत्ती, मुक्ताई, सोपान अशा मुख्य संतांच्या नावाच्या पालखी नगरप्रदक्षिणा फेरीत सहभागी होणार आहेत.

यामध्ये सहभागी प्रत्येक दिंडीत सर्वात पुढे दिंडी क्रमांक फलक, मागोमाग झेंडेकरी, टाळकरी, माळकरी, मृदुंग वादक, विणेकरी, तुलसी वृंदावन घेतलेल्या महिला तसेच वारकरी सहभागी होतात. नगर प्रदक्षिणा करताना विशिष्ट ठिकाणी पालखी, दिंडी पोहोचली की ठराविक अभंग म्हटला जातो. तांबडा मारुती चौकात मारुतीरायाचा

शरण शरणजी हनुमंता, तुज आलो रामदुता

हा अभंग होतो. पुढे उद्धव घाटावर अभंग होऊन वैष्णव चंद्रभागा वाळवंटात येतात. तेथे अवघीच तीर्थे घडली एक वेळ, चंद्रभागा डोळा दखिलिया हा अभंग वाळवंटात होतो. पंढरीत पांडुरंग ज्यांच्यासाठी आले, त्या भक्त पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतले जाते. याशिवाय वारी पूर्ण होत नाही, ते न करता वैष्णव विठ्ठल मंदिरात जात नाहीत. वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासमोर…

भला भला पुंडलिका । मानलासि जनलोका ॥
कोण्या काळे सुखे। ऐशा कोण पावत॥
नातुडे जो करणे परि। उभा केला विटेवरी॥

हा अभंग होऊन सोहळा घाटाच्या दिशेने तुकाराम महाराज मठाजवळ पोहोचतो. येथे…

श्री संताचिया माथा चरणांवरी । साष्टांग हे करी दंडवत॥
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी । वाढले अंतरी प्रेमसुख॥

हा अभंग होतो. त्यानंतर दिंड्या बेलीचा महादेव, काळा मारूती मंदिर करत चोफाळा येथे पोहोचल्यावर सर्वांनी कळस दर्शन घेतले जाते आणि अभंग होतो. सोहळा निवृत्ती मठाजवळ पोहोचतो आणि पुढे नाथ चौकातील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात जवळ आल्यानंतर नगरप्रदक्षिणा पूर्ण होते. यावेळी वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान व कृतकृत्य झाल्याचा भाव असतो. त्यानंतर वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी येतात. बारशीला उपवास सोडून आपआपल्या गावाकडे जातात. पालखी पंढरीत चार दिवस मुक्कामी असते. पौर्णिमेला पालखी गोपाळकाला करण्यासाठी गोपाळपूरला जाते. काला झाल्यावर पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. पंढरीच्या वारीमध्ये वारकर्‍यांनी वारी प्रवासात अखंड नामसंकीर्तन केले. पंढरीत विठोबाचे दर्शन घेतले. वारी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करतात. वारकरी सुखावतात, एकमेकांच्या पाया पडतात. राम कृष्ण हरी माऊली, आता भेटू पुढच्या वारीत, असे म्हणताना भावूक होतात. सर्वांच्या मनात एकच विचार असतो…

हीच माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥

Back to top button