बीआरएसमध्ये या, बाकीचे आम्ही पाहू! : मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव | पुढारी

बीआरएसमध्ये या, बाकीचे आम्ही पाहू! : मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) या, बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो’, या शब्दांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (केसीआर) यांनी भाजपचे युवा नेते नागेश वल्याळ यांना ऑफर दिली. केसीआर यांची सोलापूर शहरात बीआरएसला सक्षम नेतृत्व मिळविण्याची ही चाचपणी मानली जात आहे.

सोलापूरला दोन दिवसांच्या भेटीवर असलेल्या केसीआर यांनी मंगळवारी (दि. 27) पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश करून घेत सरकोली येथे सभा घेतली. यानंतर भोजन करून त्यांचा ताफा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या भवानी पेठेतील घराजवळ दाखल झाला. सोमवारी केसीआर यांचे भाचे तथा तेलंगाणाचे अर्थमंत्री टी. हरिश यांनी दोन मंत्र्यांसमवेत वल्याळ यांच्या घरी भेेट देऊन सुमारे तासभर खलबते केली. वल्याळ व हरिश राव यांचा एकमेकांशी गत अनेक वर्षांपासून परिचय आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हरिश राव यांनी वल्याळ यांना बीआरएसची ऑफर दिली होती. मात्र, आपण भाजपमध्येच राहणार आहोत, अशी भूमिका वल्याळ यांनी घेतली होती.

हरिश राव यांच्या पाठोपाठ केसीआर यांनीदेखील वल्याळ यांच्या घरी भेट दिली. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, संतोष भोसले, श्रीनिवास रिकमल्ले, सुभाष शेजवाल हेदेखील तिथे उपस्थित होते. या सर्वांसमवेत केसीआर यांनी बंद खोलीत सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. यावेळी केसीआर यांनी वल्याळ यांना बीआरएसची ऑफर दिली. तुम्ही फक्त आमच्या पक्षात या, पुढचे सर्व आम्ही पाहतो, असे सांगत केसीआर यांनी वल्याळ यांना गळ घातली.

यांना हैदराबाद भेटीचे निमंत्रण

या भेटीत चर्चा करताना केसीआर यांनी वल्याळ यांना सुरेश पाटील, संतोष भोसले, श्रीनिवास रिकमल्ले, सुभाष शेजवाल या सर्वांना घेऊन हैदराबादला या, असे निमंत्रण दिले. दरम्यान केसीआर यांच्या या भेटीने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

बीआरएसमध्ये आणण्याचा प्रयत्न

बीआरएसला सोलापूर शहरात अद्याप सक्षम नेतृत्व मिळाले नाही. वल्याळ यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची या पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. विविध पक्षांमध्ये नाराज असलेल्या नगरसेवक, पदाधिकार्‍यांना बीआरएसमध्ये आणण्याचा या पक्षाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून केसीआर यांनी वल्याळ यांच्या घरी भेट दिल्याचे मानले जात आहे.

सादूल यांना वल्याळ वरचढ

दोन दिवसीय सोलापूर दौर्‍यात केसीआर यांनी पहिल्या दिवशी माजी खा. धर्मण्णा सादूल यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी खास वेळ काढून नागेश वल्याळ यांचे घर गाठले. बीआरएसचे सादूल यांच्यानंतर वल्याळ यांच्याकडे सोलापूरचे नेतृत्व येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये वल्याळ हे सादूल यांना वरचढ ठरणार, अशी चर्चा आहे.

Back to top button