पंढरपूर : अपघातमुक्त आषाढी वारीसाठी पोलिसांचे प्राधान्य | पुढारी

पंढरपूर : अपघातमुक्त आषाढी वारीसाठी पोलिसांचे प्राधान्य

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज, तर जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. पंढरीतही भाविकांची गर्दी वाढत आहे. आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आठ हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार स्वयंसेवकांचीदेखील मदत घेतली जाणार असून, अपघातमुक्त वारी घडविण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

बुधवार, 21 जून रोजी आषाढी यात्रेच्या पाश्वभूमीवर पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी बैठक घेतली. यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, डीवायएसपी भोसले आदी उपस्थित होते.

आषाढी यात्रेसाठी किमान 12 ते 15 लाख भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. मुख्यत: एकादशीदिवशी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याकरिता महाव्दार घाट येथे गर्दी होऊ नये म्हणून घाटाच्या खाली वाळवंटात भाविकांचे तीन स्लॉट करण्यात येणार आहेत. यातील एका स्लॉटमध्ये दोन ते अडीच हजार भाविक थांबविण्यात येतील. एका स्लॉटमधील भाविक पुढे गेले की दुसर्‍या स्लॉटमधील भाविक सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे चेंगराचेंगरीसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे. तसेच येथील अनाथ, भिकारी यांची अन्यत्र सोय करण्यात आली आहे.
एस.टी. महामंडळाकडून देण्यात आलेल्या सवलतींमुळे भाविकांची विशेषत: महिला भाविकांची गर्दी जास्त वाढणार आहे. त्यामुळे सोनसाखळी, पर्स चोरी आदी प्रकार घडू नयेत म्हणून खास पोलिस पथकांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर माऊली स्कॉडदेखील कार्यरत असणार आहे. याव्दारे खिसेकापू व चोरट्यांंवर नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर नगरपालिका, विठ्ठल मंदिर समिती व खासगी अशा 300 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर असणार आहे.

यात्रेकरिता येणार्‍या भाविकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 18 वाहनतळे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये 12 हजार वाहने थांबण्याची सोय केली आहे. तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक कर्मचारी काम पाहणार आहेत.

असा असेल पोलिस बंदोबस्त

428 पोलिस अधिकारी, 5117 पोलिस अंमलदार, 2850 गृहरक्षक दलाचे कर्मचारी, चार एसआरपीएचच्या तुकड्या, 10 बॉम्बशोधक पथक, असा आठ हजार 395 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

Back to top button