पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात भूमिका स्पष्ट करा; वारकरी सांप्रदाय व नागरिकांचा सरकारला इशारा | पुढारी

पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात भूमिका स्पष्ट करा; वारकरी सांप्रदाय व नागरिकांचा सरकारला इशारा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने भूमिका स्पष्ट करावी. आषाढी यात्रेत शासकीय महापूजेला येताना सरकारने पंढरपूरच्या नागरिकांना विश्वास द्यायला हवा; अन्यथा आषाढी यात्रेस महापूजेला येणार्‍या मुख्यमंत्री शिंदे यांना अडवणार नाही, पण 25 लाख भाविकांना बरोबर घेऊन ‘ज्ञानोबा – तुकाराम’च्या जयघोषाऐवजी भाविक ‘अब की बार नो शिंदे – फडणवीस सरकार’चा नारा देतील, असा इशारा संत भूमी बचाव समितीचे ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांनी दिला आहे. संतभूमी बचाव व तीर्थक्षेत्र बचाव समिती यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मठात सोमवारी (दि. 19) घेतलेल्या पत्रकार परिषदेत वीर महाराज बोलत होते.

वीर महाराज म्हणाले, की सोलापूर येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहराच्या विकासकामांसाठी 2700 कोटी देत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेने शहरातील हजारो नागरिकांची घरे जाणार आहेत. यामुळे तमाम वारकरी सांप्रदाय व पंढरपूरकरांची झोप उडाली आहे. हा आराखडा पंढरपुरातील नागरिकांना मान्य नाही. त्याऐवजी घरे पाडापाडी न करता संत भूमी बचाव समितीच्या वतीने तयार करण्यात आलेला आराखडा राबवावा. घाईगडबडीत कॉरिडॉरचे उद्घाटन करू नये. कॉरिडॉरबद्दल आषाढी एकादशीपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी भूमिका जाहीर करावी अन्यथा आषाढी वारीत ‘ज्ञानोबा तुकाराम..’च्या जयघोषा ऐवजी अब की बार नो शिंदे – फडणवीस सरकार… असा नारा येथे आलेले वारकरी आणि पंढरपूरकर देणार आहेत.

दरम्यान, राज्य व केंद्र शासनाने पंढरपूरचा विकास करण्यासाठी कॉरिडॉर करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावित कॉरिडॉरला वारकरी सांप्रदाय व पंढरपूरच्या नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. मंदिर परिसर व शहराच्या अन्य भागातील मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि घरे पाडण्याचे या प्रस्तावित आराखड्यात अधोरेखित केले आहे. या आराखड्याला झालेला विरोध पाहून पंढरपूरकरांना आणि वारकर्‍यांना विश्वासात घेऊन आराखडा राबवू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार संत भूमी बचाव समितीने स्वतंत्र आराखडा तयार करून शासनाला दिला आहे. यावेळी तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, माजी नगरसेवक शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत हरिदास, नाना कवठेकर आदी उपस्थित होते.

स्थानिक आमदारांची देखील कॉरिडॉर संदर्भात ठोक भूमिका नाही. सरगम चौक ते भोसले चौक या दरम्यानच्या उड्डाण पुलाचे भूमिपूजन ऑनलाईन झाले आहे. हे आमदारांना देखील माहीत नाही. जर पंढरपूरकरांना कॉरिडॉर संदर्भात व्यवस्थित उत्तर मिळाले नाही तर सरकारला 2024 च्या निवडणुकीत याची किंमत मोजावी लागेल.
– रामकृष्ण वीर महाराज, अध्यक्ष, संत भूमी बचाव समिती

Back to top button