Sangola Accident : सांगोल्यात एकाच ठिकाणी दोन अपघात; तीन ठार तर एक जखमी | पुढारी

Sangola Accident : सांगोल्यात एकाच ठिकाणी दोन अपघात; तीन ठार तर एक जखमी

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : कोळा ते करगणी रस्त्यावर बाणुरगड पाटीजवळ जेसीबी आणि मोटरसायकल यांच्यात समोरा-समोर झालेल्या अपघातामध्ये गोविंद राम आलदर (वय ४३ वर्षे, कराडवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहून मोटरसायकलवर पुढे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक झाल्याने तानाजी आप्पासो सूर्यवंशी (वय ४९ वर्षे, रा. कोळा) व पुढच्या मोटरसायकल वरील अक्षय राजेश उगलेकर (रा. ठाणे) याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात रुपेश अलदर हा तरुण जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोळा करगणी रस्त्यावर बाणुरगड पाटीजवळ बुधवारी १० मे रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास विना नंबरचा जेसीबी व मोटरसायकल (क्र. एम. एच. ०४ बी.ए. ६५१३) यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये कराडवाडी (कोळा) येथील गोविंद रामा आलदर हा जागीच ठार झाला. तर रुपेश आलदर हा जखमी झाला. याची मोटरसायकल ही जेसीबी बकेटच्या खाली अडकली होती. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ही अपघात पाहून कोळा येथील तानाजी सूर्यवंशी हे पुढे जात असताना वीस मीटर अतरावर पात्रेवाडीहून कोळ्याकडे निघालेल्या भरधाव मोटरसायकला धडक झाली. यामध्ये (क्र एम.एच. १ २ डी. एच . ५९२७) व (क्र एम .एच. ३० बी. एच. २९०९) या दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक झाली. या दुसऱ्या अपघातात पात्रेवाडी येथील लग्न कार्यासाठी ठाण्याहून आलेल्या अक्षय उगलेकर जागीच मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये जखमी झालेल्या तानाजी सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे घेवून जाताना त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. यातील एका अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाणे येथे झाली असून सांगोला पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button