Child Marriage : बालविवाह रोखण्यास पंढरपूर ग्रामीण पोलिसांना यश | पुढारी

Child Marriage : बालविवाह रोखण्यास पंढरपूर ग्रामीण पोलिसांना यश

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह मंगळवारी (दि. २) रोजी होणार होता. मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई करत हा बालविवाह रोखला आहे. तसेच संबंधित अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समिती, सोलापूर येथे समुपदेशनासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह (दि. 2 मे) रोजी होणार होता. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नागरिकांकडून मिळाली. त्यांनी लगेच पोलीस ठाण्याकडील पोसई जयशंकर जाधव, सपोफौ मारुती दिवसे, मपोना आपर्णा माळी, पोकॉ रशिद मुलाणी, पोकॉ सोमनाथ मदने असे शासकीय वाहनाने (दि.1 मे) रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचून बालविवाह रोखण्यात आला. तसेच बालिकेची नियमित वैद्यकीय तपासणी करुन यातील बाल कल्याण समिती, सोलापुर येथे समुपदेशनासाठी रवाना करण्यात आले.

ही कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीश सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव (पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे), यांनी केली.

आपल्या शेजारी, आपल्या वस्तीवर, आपल्या गावात असा अल्पवयीन विवाह होणार असेल. तर नागरिकांनी कोणत्याही मोबाईल फोनवरून १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे असे आवाहन धनंजय जाधव पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण यांनी केलेले आहे.

Back to top button