विद्यार्थी मारहाण प्रकरणाचे विधानसभेत पडसाद | पुढारी

विद्यार्थी मारहाण प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीदरम्यान विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या ‘अभाविप’च्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी विधानसभेत आमदार रामभाऊ सातपुते यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर कारवाईची मागणी केली आहे. ‘अभाविप’कडून कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 14 मार्च रोजी वार्षिक अंदाजपत्रकावर अधिसभा सुरू होती. यावेळी सभागृहाबाहेर ‘अभाविप’चे विद्यार्थी विविध मागण्यांचेे निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, सभा सुरू असल्याने कुलगुरू निवेदन स्वीकारण्यासाठी सभागृहाच्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना सभागृहात जाण्यापासून रोखत दंडूक्याने मारहाण केली.

हे प्रकरण विधानसभेपर्यंत गेले. विद्यापीठाच्या आवारात कुलगुरू पोलिस बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना मारहाण करावयास लावतात. त्यामुळे कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार रामभाऊ सातपुते यांनी केली. दरम्यान ‘अभाविप’ने कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव मोहीम तीव्र केली आहे.

Back to top button