शॉर्टसर्किटमुळे ४ एकर क्षेत्रातील उस खाक; सुमारे ३ लाखांचे नुकसान | पुढारी

शॉर्टसर्किटमुळे ४ एकर क्षेत्रातील उस खाक; सुमारे ३ लाखांचे नुकसान

सांगोला : पुढारी वृत्तसेवा :  शॉर्टसर्किट मुळे 4 एकर क्षेत्रातील ऊस जाळून खाक झाला. यामध्ये सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जमीन गट क्र 634 कडलास ता. सांगोला येथे घडली. भारत रामचंद्र कदम यांनी महसूल विभागास कळविले होते. त्यानुसार तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कडलास येथील जमीन गट क्र 634 मधील शेतकरी भारत रामचंद्र कदम यांचा 18 जानेवारी रोजी दुपारी शॉर्टसर्किट झाल्यानें त्यांच्या शेतातील तीन एकर तर शेजारी असणारे बाळासाहेब केदार यांचा एक एकर उसाचा फड जळून खाक झाला आहे. काही दिवसांतच उसाची तोड होणार असल्याने, या उसाच्या फडामध्ये पालापाचोळा अधिक असल्याने आगीने तीव्र रूप धारण केले होते. गावातील व आजूबाजूच्या शेतातील शेतकर्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात आली नसल्याने यामधे दोन्ही शेतकर्‍यांचे मिळून सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्टीमुळे उभी पिके पाण्यात गेली आहेत. फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. यातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोपर्यंतच इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन शेतकर्‍यांचा उभ्या पिकातील ऊस जळून खाक झाला असल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत सांगोला पोलिसांत दाखल करणार असल्याचेही शेतकरी भारत कदम यांनी सांगितले आहे.

Back to top button