पंढरपूर : चंद्रभागातीरी वैष्णवांचा मेळा! | पुढारी

पंढरपूर : चंद्रभागातीरी वैष्णवांचा मेळा!

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर दोन वर्षांनी भरलेला निर्बंधमुक्त कार्तिकी एकादशीचा सोहळा लाखोे भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. ‘तुझे दर्शन व्हावे आता, तू सकल जणांचा दाता’, असे म्हणत चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा करत भाविकांकडून हरिनामाचा जयघोष करण्यात आला. 6 लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावल्याने पंढरीत वैष्णवांची मांदियाळी दिसून आली.

यंदा प्रथमच निर्बंधमुक्तपणे कार्तिकी वारी सोहळा साजरा करण्यात आला. मजल दरमजल करत विविध संतांच्या दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत आले. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. तर 65 एकर येथील भक्तीसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागातही भाविक राहुट्या, तंबू उभारून वास्तव्य करत आहेत. कार्तिकी यात्रा निर्बंधमुक्तपणे भरल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. भजन, कीर्तन, प्रवचनात महाराज मंडळी तर ऐकण्यात भाविक दंग झाले आहेत. अधिकतर भाविकांनी चंद्रभागा स्नान केल्यानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यावर पसंदी दिली. राज्यातून आलेले भाविक दर्शन रांगेत उभारून पदस्पर्श दर्शन घेण्यावर भर देत आहेत. मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत सुमारे 70 हजार भाविक उभारले आहेत. दर्शन रांग पत्राशेडमध्ये दाखल झाली आहे. वॉटरप्रूफ दर्शन रांग व पोलिस संरक्षण तसेच अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्यात येत आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 8 तासांचा अवधी लागत आहे.

भक्तिसागर 65 एकर येथे सुमारे 2 लाख भाविक वास्तव्य करत आहेत. येथे वीज, पाणी, शौचालये, प्रथमोचार केंद्र, पोलिस सेवा पुरवण्यात आली असल्याने भाविक आनंदात आहेत. तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन, प्रवचन सुरू असून भाविक भक्तीत दंग झालेले आहेत. येथील भाविकांची भक्ती पाहून खर्‍या अर्थाने भक्तिसागरात भाविक बुडल्याचे चित्र दिसून येते.

भाविकांची कार्तिकी यात्रा सुखकर व सुलभपणे पार पडावी, म्हणून पोलिस विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कोणताही अनूचित प्रकार न घडता, यात्रा सुरळीत पार पडत आहे. तर चोर्‍या रोखण्यासाठी वारकर्‍यांच्या वेषात पोलिस तैनात आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महापूजेला आल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती. सुमारे 3524 अधिकारी व पोलिस कर्मचारी यात्रेकरिता तैनात करण्यात आलेले आहेत.

पाच ठिकाणी आपत्कालीन विभाग कार्यरत ठेवण्यात आलेला आहे. भाविकांना काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत आहे. तर आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत.

आषाढी यात्रेकरिता यंदा विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात येत आहेत. तर सुमारे दीड हजार एसटी बसेस भाविकांच्या सेवाकरीता धावत आहेत. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके तयार करण्यात आली असून त्या त्या विभागाकडे बसेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. तर यात्रेदरम्यान शहराबाहेरुन जड व अवजड वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्यामूळे यावेळेस वाहतूक कोंडीची मोठी समस्या जानवली नाही.

प्रासादिक साहित्य व इतर जीवनावश्यक साहित्याच्या दुकाने, स्टॉलवर भाविक मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. यामूळे यंदा बाजारपेठेत मोठी आर्थिक उलढाल होण्याचा ंदाज व्यक्त केला जात आहे.

Back to top button