आम्ही राजाभाऊंसाठी बेअरर चेक आहोत : देवेंद्र फडणवीस | पुढारी

आम्ही राजाभाऊंसाठी बेअरर चेक आहोत : देवेंद्र फडणवीस

बार्शी, पुढारी वृत्तसेवा : आम्ही राजाभाऊ राऊत यांच्यासाठी बेअरर चेक असून शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. जनतेसाठी 24 तास काम करणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडला असून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल, विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते शुक्रवारी (दि. 4) रोजी बार्शीत शहर व तालुक्याच्या विकासाला भरीव निधी दिल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांच्या वतीने आयोजीत नागरी सत्कार व विविध विकास कामाच्या प्रारंभ व लोकार्पण व नागरी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना बोलत होते.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद्र राऊत, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. प्रशांत परिचारक, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राम सातपुते, आ. सुरेश धस आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही 65 मि.ली.च्या अतिवृष्टीच्या निकषात महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच बदल करून अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत केली. तीन महिन्यांत तब्बल 7 हजार कोटींची मदत राज्यातील शेतकर्‍यांना दिली आहे. राज्यातील शेतकर्‍यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर फिडर योजना पुन्हा नव्याने कार्यान्वित केली जाणार आहे. त्याचा लाभ शेतकर्‍यांना नक्कीच होईल. तसेच शेतकर्‍याच्या शेतात सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून प्रती हेक्टरी 75 हजार भाडे दिले जाणार आहे. तीस वर्षांच्या करारानंतर जमीन त्या शेतक-यास परत दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.

तालुक्यातील शेतकर्‍यांना 85 कोटींच्या लाभाबरोबरच आ. राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याने तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, न्यायालयात इमारत, भुयारी गटार, जलजीवन मिशन आदी योजनांतून मोठा निधी मिळाला आहे. तालुक्यातील उपसा सिंचन, उजनी पाणीपुरवठा आदी योजना तातडीने मार्गी लावल्या जातील. उपसा सिंचन योजनेचे 350 कोटींचे टेंडर येत्या काही दिवसांत जाहीर होईल. भुयारी गटार योजना पंधरा पंधरा वर्षं रखडते. मात्र आ.राजेंद्र राऊत यांनी संघर्ष करून ही योजना पूर्ण केली. शहर मध्यवर्ती असल्याने लगतच्या अनेक तालुक्यांतील लोकांचा वावर या शहरात असतो.

आ. राजेंद्र राऊत म्हणाले, तालुक्यातील शेतकर्‍यांना आपल्या आगमनाची प्रतीक्षा होती. तालुक्याच्या विकासाला व अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांना मदत दिल्यामुळे शेतकर्‍यांची दिवाळी गोड केल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. तसेच शहरातील पायाभूत सुविधा यामध्ये भुयारी गटार, भगवंत मैदान, न्यायालय इमारत, घरकुल, शहर व तालुक्यातील अनेक रस्ते, साठवण तलाव, रखडलेली उपसा सिंचन योजना आदीला मोठी मदत केली.

अजूनही बार्शीकरांच्या आपणाकडून मोठ्या अपेक्षा असून त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. साठवण तलाव, बंधारे यासाठी निधी उपलब्ध करून दिला असला तरी तालुका आवर्षणप्रवण असल्यामुळे तालुक्यातील शेतीला पाण्याची तहान आहे. त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे असेही आ. राजेंद्र राऊत म्हणाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बार्शी शहर भुयारी गटार योजना लोकार्पण सोहळा, प्रधानमंत्री आवास योजना पीएमवायअंतर्गत 1596 घरांचा पायाभरणी सोहळा, महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर 11 रस्त्यांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा झाला.

आ. राजेंद्र राऊत व इतरांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांदीची गदा व भगवंताची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विजय राऊत, माजी सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, रमेश पाटील, संचालक रावसाहेब मनगिरे, चेअरमन रणवीर राऊत, सचिन मडके, भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे, दिलिप गांधी, संदेश काकडे, दीपक राऊत, विजय चव्हाण, सुधीर बारबोले, संतोष निंबाळकर, राहुल मुंढे, उद्योजक राजेंद्र सुरवसे, बाळासाहेब काकडे, महेश करळे, केशव घोगरे, श्रीधर कांबळे, बाबासाहेब मनगिरे, भारत पवार, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

बार्शी शहर झाले भाजपमय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते. शहरात अनेक ठिकाणी व प्रवेशद्वारावर स्वगाताचे मोठ मोठ फलक लावण्यात आले होते. दुपारी दीड वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे वाजत गाजत सभा स्थळाकडे येताना दिसत होते. सभास्थळावर हातात भाजपचे ध्वज व गळ्यात भगवे उपरणे घातलेले हजारो कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. शहरातील प्रमुख मार्गांसह सभास्थळ परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button