सोलापूर : तुळजाभवानी मातेची मंचकी मोह निद्रा; सेवेतून सामाजिक ऐक्याचे दर्शन, नऊ दिवस चालणार निद्रा | पुढारी

सोलापूर : तुळजाभवानी मातेची मंचकी मोह निद्रा; सेवेतून सामाजिक ऐक्याचे दर्शन, नऊ दिवस चालणार निद्रा

तुळजापूर; संजय कुलकर्णी : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रौत्सवापूर्वीच्या मंचकी मोह निद्रेस शनिवारी (दि. 17) सायंकाळी ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात उत्साहात सुरुवात झाली.

भाद्रपद वद्य अष्टमी दिनी मातेच्या सायंकाळच्या नित्य पूजेची घाट सात वाजता होऊन मातेच्या अंगावरील सकाळच्या पूजेचा साज उतरविण्यात आला. त्यानंतर मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक सुरू करण्यात आले. त्यानंतर भाळी मळवट चोपून मातेला वस्त्रालंकार चढविण्यात आले. नैवेद्य, धुपारती, अंगारा पार पडला. यावेळी नगारा, घाटीचा नाद सुरू होता. देवीची प्रक्षाळ पूजा होऊन कोरडा अंगारा काढण्यात आला. त्यानंतर देवीच्या मानकरी भोपे पुजार्‍यांकरवी आरत्या ओवाळून मातेची द़ृष्ट काढण्यात आली. शिवाय मातेला जेजुरीच्या खंडोबा मंदिरातून आलेला बेलभंडारा लावून ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष करीत मातेची मुख्य मूर्ती सिंहासनावरून हलवून सिंह गाभार्‍यातील शेजघरात चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. यावेळी मातेचे भोपे पुजारी, पाळीकर, उपाध्ये पुजारी, मंदिराचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मंदीराचे महंत चिलोजी बुवा, वाकोजी बुवा, हमरोजी बुवा, मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक सौ. योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम परमेश्वर, भोपे पुजारी सचिन परमेश्वर, विनोद सोंजी,संजय कदम, दिनेश परमेश्वर, अमर परमेश्वर,अतुल मलबा, विवेक दिनोबा, सुहास भैय्ये, दत्तात्रय कदम, सचिन पाटील, शशिकांत पाटील, शुभम पाटील, सेवेकरी नानासाहेब चोपदार, पोहेकर, छत्रे आदींसह पलंगाचे सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी मातेच्या शेजघराची व चांदीच्या पलंगाची साफसफाई, डागडुजी करून माते चरणी सेवा रूजू केली.

आजच्या देवीच्या पूजेचा मान भोपे पुजारी बाळकृष्ण व्यंकटराव कदम यांचा होता. आज सायंकाळी मातेला पंचामृत अभिषेक झाल्यानंतर तब्बल दहा दिवस मातेला सुगंधी तेल लावण्यात येते. पंचामृत केवळ पायाला लावले जाते. मूर्ती सिंहासनारूढ झाल्यावरच अभिषेक पूर्ववत होतात.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन!

अनादी काळापासून अनेक मुस्लिम भक्तही देवीच्या निद्रेसाठी गाद्या, उशांना कापूस पिंजण्याचे काम करीत आहेत. यातून सामाजिक ऐक्य दिसून येते. श्री तुळजाभवानी मातेच्या गाद्या, उशांसाठी सुमारे तीन क्विंटल कापूस लागतो. यापासून सहा गाद्या व 70 लहान उशा
बनविण्यात येतात. मातेच्या गादी, उशीसाठी शहर व ग्रामीण भागातून सुमारे हजारांवर महिला आराधीनी सेवेसाठी मंदिरात दाखल होतात. गाद्या, उशांचा कापूस पिंजून काढण्यासाठी शमशोद्दिन बाशुमियाँ व त्यांचे असंख्य सहकारी सेवा करतात. निवडलेला कापूस गाद्या, उशांमध्ये भरण्याचा मान अच्युत नागनाथ कुळकर्णी यांच्याकडे आहे. कापूस भरलेल्या गाद्या, उशा शिवण्याचे काम भावसार समाजाचे जनार्दन निकते हे करतात. अशा नेकांच्या सेवेतून मातेची मंचकी निद्रा सुरू होते.

Back to top button