विजय वड्डेटीवार म्हणाले, ओबीसी आरक्षण जाहीर केल्याशिवाय निवडणुका नाहीत | पुढारी

विजय वड्डेटीवार म्हणाले, ओबीसी आरक्षण जाहीर केल्याशिवाय निवडणुका नाहीत

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण जाहीर केल्याशिवाय त्या निवडणुका होऊ देणार नाहीत. त्यासाठी सरकारवर सर्वतोपरी दबाव टाकू, असा पवित्रा राज्याचे मदत कार्य व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी घेतला.

सोलापुरात जुळे सोलापूर येथे आयोजित ओबीसी निर्धार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ते होते. यावेळी यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रणिती शिदे, राजेश राठोड, माजी खासदार हुसेन दलवाई, अ‍ॅड. रामहरी रुपनवर, माजी आमदार रामराव वडकुते, नरसय्या आडमसिद्धराम म्हेत्रे, शरद कोळी आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विजय वड्डेटीवार म्हणाले, वर्षानुवर्षे असलेले ओबीसी आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे. घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी नेत्यांना एकत्र आणून त्यांना सत्ताधारी बनविण्याचा आपला माणस आहे. त्यामुळे या समाजाने पोटजाती विसरून एकत्र यावे. ओबीसी समाजाने आता आत्मनिर्भर होवून ‘मागणारा समाज नाही, तर देणारा सत्ताधारी समाज’ बनायला हवे.

संबंधित बातम्या

ते म्हणाले, राज्यात 2022 मध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचे आरक्षण कायम ठेवा, अन्यथा निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी आपण सरकारवर दबाव वाढवू. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना डावलून या निवडणुका होवू देणार नाही.

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी समाजाच्या विकासासाठी आपण कायम झुकते माप देत आहोत. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घ्या. ओबीसींच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पाय धरू. त्यासाठी विरोधी पक्षाने मदत करावी. असे त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ंयाना आवाहन केले. ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे.

यावेळी प्रणिती शिंदे, नरसय्या आडम, राजेश राठोड, हुसेन दलवाई, रामराम वडकुते, लक्ष्मण माने आदींनी मनोगत व्यक्त केले.

संयोजन समितीच्यावतीने वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना ‘ओबीसी नायक’ अशी पदवी देवून चांदीचा मुकुट घालण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शरद कोळी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

कोरोना नियमांची पायमल्ली

कोरोना काळात होणार्‍या या पहिल्याच मेळाव्याला शासनाने अधिकृत परवानगी दिली होती. त्यामुळे शासनाच्या मागदर्शक सूचनाचे पालन करून हा मेळावा घेण्याचे पोलिस व प्रशासनाने आवाहन केले होते. मात्र, मंत्र्याच्याच मेळाव्यात नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र दिसून आले.

मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र आमच्या कोट्यातून नको

मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. ते जरूर द्यावे. मात्र, आमच्या कोट्यातून नको. त्यांना स्वतंत्र द्यावे, अशी ठाम भूमिका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सोलापुरात मांडली.

ओबीसी समाजाचा त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात निर्धार मेळावा पार पडला. त्यानंतर पत्रकार बैठकीत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, समाजातील प्रस्थापितांना आरक्षण देताना विचार करायला हवा मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आपलीही भूमिका आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावे. ओबीसीला घटनेने दिलेला आधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचे आरक्षण जर कोणी हिसाकावून घेत असेल तर त्यासाठी धनगरांची

काठी हातात घेवून आपण रस्त्यावर उतरू.

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी समाजाने आपल्याला नेता बनविले असेल तर त्यात आपले दुमत नाही. आपण ज्या समाजात जन्माला आलोय त्यांच्या व्यथा आणि समस्या सोडविण्याचे आपली भूमिका आहे.त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी त्यावर आपण काही बोलणार नाही.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारमधील काहीजण ओबीसी आरक्षणाविरोधात आहेत. ते झारीतील शुक्राचार्य शोधण्याची गरज असल्याचे मत मांडले होते. त्यावर विचारता वड्डेवार म्हणाले, बावनकुळे हे विरोधी पक्ष भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांना कोणकोण शुक्राचार्य वाटतात हा त्यांचा प्रश्न आहे. पण राज्य सरकारमधील तीनही घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे ओबीसी आरक्षणासाठी अनुकुल आहेत. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत.

Back to top button