सोलापूर : आयुक्‍त आग्रही, यंत्रणेबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह! | पुढारी

सोलापूर : आयुक्‍त आग्रही, यंत्रणेबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह!

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी असलेल्या सोलापुरात प्रमुख बाजारपेठांमधील रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीची होणारी कोंडी हे सर्वश्रुत आहे; पण आता मोबिलिटी कमिटीकडून याबाबत गंभीरपणे विचार सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिस शाखेने दुकानांसमोरील साहित्याच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याबाबत मनपाला पत्र दिले आहे. मनपा आयुक्‍त कारवाईबाबत आग्रही आहेत; पण त्यांच्या यंत्रणेकडून कारवाई प्रभावीपणे होण्याविषयी पोलिसांना शंका आहे.

शहरात मधला मारुती, नवी पेठ, कुंभार वेस, चाटी गल्ली, अशोक चाक, 70 फृट रोड यासह विविध ठिकाणी बाजारपेठा आहेत. याशिवाय मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दुकाने आहेत. वरील भागात व्यापारी, विक्रेते हे आपल्या दुकानासमोर वा फूटपाथवर विक्रीचे साहित्य थाटत असल्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. गत अनेक वर्षांपासून हे चित्र आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्यरुपी अतिक्रमणामुळे फृटपाथच गायब झाले आहेत.

दुकानांसमोर केवळ साहित्याचे अतिक्रमण नसून साईन बोर्ड, शेडदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा ठिकाणी वाहनांचेदेखील पार्किंग केले जाते. यामुळे वाहतुकीला कोंडी होण्याबरोबरच अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र पार्किंगसंदर्भात कारवाईबरोबरच रस्त्यावरील, दुकानासमोरील साहित्यांच्या अतिक्रणावर मनपाकडून प्रभावीपणे कारवाई झाल्यास वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शहर वाहतूक शाखेने नुकतेच मनपाला याबाबत पत्र दिले आहे. यामध्ये अतिक्रमण करणार्‍या विक्रेते, दुकानदारांवर मनपाने कारवाई करावी असे म्हटले आहे.

मनपा आयुक्त अशा कारवाईबाबत आग्रही आहेत, पण मनपाच्या यंत्रणेने प्रभावीपणे कारवाई करुन व्यापारी, विक्रेत्यांवर अंकुश ठेवावे अशी पोलिसांची अपेक्षा आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबवतील का? कारवाईत सातत्य ठेवतील का? याविषयी पोलिसांना शंका आहे. एकंदर वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी केवळ पोलिसांकडून बेशिस्त पार्किंगवर कारवाई करुन उपयोग नाही तर मनपाकडूनदेखील अतिक्रमणावर कारवाईची गरज आहे. या दोन्ही कारवाई प्रभावीपणे पार पाडल्यास तर शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या नक्कीच सुटल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button