स्वामी समर्थांच्या जयघोषाने अक्‍कलकोट नगरी दुमदुमली | पुढारी

स्वामी समर्थांच्या जयघोषाने अक्‍कलकोट नगरी दुमदुमली

अक्‍कलकोट;  पुढारी वृत्तसेवा :  अक्‍कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात असंख्य स्वामी भक्‍तांच्या उपस्थितीत श्री गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्‍तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वामी समर्थांच्या जयघोषात अवघी अक्‍कलकोट नगरी दुमदुमली. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यांतून हजारो भाविक स्वामीचरणी नतमस्तक झाले.

दत्त अवतारी अक्‍कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरू, सद‍्गुरूंचे गुरू, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. या मंदिरातील वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी अनेक भाविकांना मार्गदर्शन केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे गुरूस्थान म्हणून स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या या वटवृक्ष मंदिराकडे पाहण्याचा भाविकांचा द‍ृष्टिकोन आहे. त्यामुळे आज असंख्य स्वामीभक्‍तांनी भर पावसातही स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली.

दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती तर दुपारी 11.30 वाजता नैवेद्य आरती झाली. पहाटे 5 वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्‍तांना देवस्थानच्या वतीने शीरा प्रसाद वाटप करण्यात आला. कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे स्वामी भक्‍तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये करण्यात आली होती.

स्वामी भक्‍तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्‍तांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. गुरूपौर्णिमेनिमित्त स्वामी प्रसाद म्हणून देवस्थानच्या वतीने भाविकांना देण्यात येणार्‍या भोजन महाप्रसादाचा दुपारी 12 ते 3 या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्‍त निवास येथे असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आज अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार, सोलापूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेश परदेशी आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.

यावेळी महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, रवी मलवे, प्रा.शिवशरण अचलेर व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकर्‍यांनी तसेच पोलीस प्रशासनाने परिश्रम घेतले.

Back to top button