सोलापूर : माळशिरस येथे बैलपोळा उत्साहात साजरा | पुढारी

सोलापूर : माळशिरस येथे बैलपोळा उत्साहात साजरा

माळशिरस; पुढारी वृत्तसेवा :  माळशिरस शहर व परिसरात बैलपोळा (बेंदूर) सण उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या शेतकरी बैलापेक्षा यांत्रिक अवजारे शेती कामासाठी वापरत असल्याने शेतकर्‍यांकडे बैलांची संख्या कमी आहे. परंतु, ज्या शेतकर्‍याकडे बैल आहेत, त्यांनी बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढून बैलपोळा साजरा केला. कोरोनामुळे दोन वषेर्र् बैल पोळा साजरा केला नव्हता. परंतु दोन वर्षांनंतर बैलपोळा साजरा होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह दिसून येत होता.

आषाढ पौर्णिमेला माळशिरस शहर व परिसरांत बैलपोळा साजरा करण्यात येतो. माळशिरस येथील पाटील कुटुंबाकडे पोळ्याचा पहिला मान आहे. पाटील कुटुंबाच्या बैलांचे ग्रामदैवत मारुती मंदिरात पूजन करून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर शहरात बैलपोळ्याला सुुुरुवात होते. बैल पोळ्यानिमित्त शेतकर्‍यांनी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून सजवून वाजतगाजत मिरवणूक काढतात. काही शेतकर्‍यांनी आपल्या घरी शेतातच बैलांना सजवून बैलपोळा साजरा केला. शहरांत दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. त्यातही अनेक शेतकर्‍यांनी बैलाची मिरवणूक काढली.

बैल पोळ्यानिमित्त शहरात पुणे-पंढरपूर मार्गावर बैलांना सजविण्यासाठी लागणार्‍या रंग, बेगड, गोंडे, हार, झूल आदी साहित्यांची दुकाने सजली होती. शेतकर्‍यांनी हे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यंदा या साहित्याच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. शहरातील अनेक कुटुंबात मातीच्या बैलाची पूजा करून सण साजरा करतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात मातीचे बैल विक्रीसाठी आले होते. तेथेही नागरिकांनी बैल खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. एकंदरीत शेतकर्‍यांचा महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा उत्साहात साजरा झाला.

Back to top button