सोलापूर : नागरिकांनो, ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ | पुढारी

सोलापूर : नागरिकांनो, ‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’

दक्षिण सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण सोलापूर आरोग्य विभागाच्यावतीने अतिसार पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पावासाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागांत आशा वर्करच्या माध्यमातून झिंकच्या गोळ्या आणि ओआरएसची पाकिटे देण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने पावसाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने अतिसार नियंत्रण पंधरवडा सुरू आहे. लहान मुले आणि वृद्धांना पाणी उकळून गार करूनच द्यायला हवे. उघड्यावरचे खाद्यपदार्थ, शिळे अन्‍न खाऊ नये. अतिसाराचा त्रास होत असल्यास ओआरएसचे द्रावण म्हणजेच मीठ, साखर, पाणी दोन वर्षार्ंखालील मुलांना पाव ग्लास, दोन वर्षांवरील मुलांना अर्धा ग्लास आणि दहा वर्षांवरील मुलांना पितील तितके हे द्रावण देण्यात यावे. झिंकच्या गोळ्या शरीरातील आतडी व्यवस्थित ठेवण्याचे आणि त्यातील जंत काढून टाकण्याचे काम करतात. त्यासाठी झिंकच्या गोळ्या देण्यात येत आहेत. याचबरोबर ओआरएसचे द्रावण कसे तयार करायचे याचीही माहिती आशा वर्करच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी जाऊन देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉ. सारिका होमकर यांनी सांगितले.

पावासाळ्यात बहुतेक आजार हे दूषित पाण्यामुळे होत असतात. तेव्हा पावसाळा सुरू झाल्याने मुख्यत्वेकरुन पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घ्यावी. जेणेकरून आपले आणि आपल्या कुुटुंबाचे आरोग्य चांगले राहील.

Back to top button