ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त डिसले गुरुजी यांचा राजीनामा | पुढारी

ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त डिसले गुरुजी यांचा राजीनामा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : परितेवाडी (ता. माढा) येथील आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला आहे. त्यांनी तो 7 जुलै रोजी दिल्याचे जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले. शासकीय नियमानुसार त्यांनी शिक्षण विभागास यासाठी एक महिन्याची नोटीस दिल्याचे ते म्हणाले.

अमेरिका येथील फुलब्राईट या संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी डिसले गुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी यासाठी सहा महिन्यांची रजा शिक्षण विभागाकडे मागणी केली होती. रजा मंजूर करण्यावरुन काही महिन्यापुर्वी शिक्षणाधिकारी व डिसले गुरुजी यांच्यात वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार डिसले गुरुजी यांना रजा मंजूर करण्यात आली होती. असे असतानाही आता डिसले गुरुजी यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा अर्जात त्यांनी कोणतेही कारण नमूद केले नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

रणजीत डिसले यांचा राजीनामा मंजूर झाला तर 8 ऑगस्ट रोजी त्यांना शासकीय सेवेतून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. राजीनामा माघार घेण्यासाठी डिसले गुरुजी यांच्याकडे तीन महिन्यांचा कालावधीही असणार आहे. या कालावधीत त्यांच्याकडून काय भूमिका घेण्यात येणार याबाबतही शिक्षण विभागात चर्चा होत आहे.

दरम्यान, शिष्यवृत्तीसाठी डिसले यांना जि.प.प्रशासनाने यापुर्वीच सहा महिन्यांसाठी रजा मंजूर केला आहे. रजा मंजूर केल्यानंतर रणजीत डिसले यांच्या प्रतिनियुक्तीचा विषय चर्चेत आला. वेळापूर येथील डायट या प्रशिक्षण संस्थेत डिसले यांची प्रतिनियुक्ती असताना ते त्या ठिकाणी हजर नव्हते. असे असतानाही त्यांनी वेतन घेतल्याचा विषय चर्चेत आला. याप्रकरणी चौकशी अहवाल शिक्षण विभागाकडून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला होता. मात्र सीईओ दिलीप स्वामी यांनी याप्रकरणी सविस्तर कागदपत्रांची पुर्तता करुन सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागास दिले होते. या प्रकरणाचा अहवाल अंतीम टप्यात असतानाच डिसले यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा जि.प.प्रशासन व डिसले यांच्यात वाद तर निर्माण झाला नसावा ना अशी शंका सर्वत्र घेतली जात आहे.

Back to top button