सोलापूर : मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची झाली गोची | पुढारी

सोलापूर : मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची झाली गोची

सोलापूर; संतोष आचलारे : नव्या सत्ताकारणात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची चांगलीच गोची झाली. गृहमंत्री अमित शहांच्या रिमोटवरच मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची भावना इच्छुक आमदारांत आहे. विशेषतः माजी मंत्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख या दोन्ही दावेदार नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही आता शंका उत्पन्न झाली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील या आशेने सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी तातडीने मुंबई गाठली. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडल्याने मंत्रिपदासाठी इच्छुकांची पंचाईत झाली. फडणवीस मुख्यमंत्री असते तर मंत्रिपद खेचून आणता आले असते, आता मंत्रिमंडळ निवडण्याचा रिमोट कंट्रोल पूर्णपणे अमित शहांकडे गेला आहे.

दरम्यान, दिल्‍लीतून ऐनवेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते, अक्‍कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघात आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारसभेला अमित शहा उपस्थित राहिले होते. याशिवाय कनार्टकातील आरएसएसच्या वजनदार पदाधिकार्‍यांशी कल्याणशेट्टी यांची असलेली जवळीकही त्यांना फलदायी ठरण्याची शक्यता आहे. नवा युवा चेहरा व मंत्रिमंडळातील सामाजिक समतोल राखण्यासाठी आ. राम सातपुते यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांच्यापैकी आ. विजयकुमार देशमुख यांचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या गाडीने गेलेले, ‘काय झाडी..काय डोंगार..काय हाटील…’ असा संवाद साधून राज्यात प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पारडे अधिक जड असल्याने त्यांना मंत्रिपद मिळेल, असे स्पष्ट होत आहे.

Back to top button