युवकांचा सहभाग अन् नेट वारी स्वागतार्ह | पुढारी

युवकांचा सहभाग अन् नेट वारी स्वागतार्ह

फलटण : संत ज्ञानेश्‍वर माऊलींचा सोहळा दिवसेंदिवस व्यापक होत चालला आहे. या सोहळ्यात अनेक बदल होत आहेत. हे काळानुरूप होत असले, तरी या सोहळ्यातील वाहनांची वाढती संख्या, त्यामधून निघणारा धूर तसेच कर्णकर्कश आवाज यावर पर्याय शोधण्याची गरज आहे. माऊलींच्या सोहळ्यात पूर्वी बैलगाड्या होत्या. नंतर ट्रॅक्टर आले. आता ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर, ट्रक, जीप, कार, आलिशान मोटारी या सोहळ्यात असतात. या वाहनांमधून बाहेर पडणारा धूर वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. पर्याय नसल्यामुळे काही करता येत नाही.

माऊली पालखी सोहळ्यात सहभागी रथाच्या पुढील आणि मागील सुमारे 400 दिंड्या धरल्या, तरी प्रत्येक दिंडीत सरासरी 6 ते 7 वाहने आहेत. यामध्ये मोकळ्या समाजातील आणखी तीनशे दिंड्या धरल्या, तर प्रत्येक दिंडीत सरासरी चार ते पाच वाहने आहेत. याचाच अर्थ माऊली पालखी सोहळ्यात सुमारे 50 हजार वाहने कार्यरत आहेत. याशिवाय माऊली पालखी सोहळा बंदोबस्तासाठी पोलिस, जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणा या सर्व विभागांची किमान 5 हजार वाहने कार्यरत असतात. तसेच माऊलींचे दर्शन घेण्यासाठी बाहेर गावाहून रोज येणारी दहा हजार वाहने आहेत.

पहाटेच्या वेळी वाहने दिंडीचे साहित्य घेऊन पुढे जातात. त्यावेळी या वाहनातून बाहेर पडणारा धूर वारकर्‍यांना त्रासदायक ठरतो. जीव मुठीत धरून वारकरी पहाटे चालतात. या वाहनांना पर्यायी वाहने म्हणून दुसरी कोणती सुविधा देता येऊ शकते का? इलेक्ट्रिक वाहनांनाच वारीमध्ये परवानगी देता आली, तर त्या द‍ृष्टीने काय करावे लागेल, याचाही विचार राज्य शासनाने केला पाहिजे. वारीमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. पूर्वी वारीला निघालेला माणूस परत येईपर्यंत त्याचे कुटुंबीय त्याची वाट पाहायचे. आता आळंदीपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक मुक्‍कामाच्या ठिकाणी, तसेच दिवसभर कधीही वेळ मिळेल, तेव्हा वारकरी घरच्यांना फोन करतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता व्हिडीओ कॉल लावणेही सहज शक्य झाले आहे.

दुसरे म्हणजे वारी फक्‍त म्हातार्‍या माणसाने किवा ज्याला काम-धंदा नाही त्यांनीच करायची असते, असा एक समज रूढ आहे; मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे चित्र बदलत चालले आहे. सुशिक्षित युवक-युवती, डॉक्टर, वकील, विद्यार्थी, तसेच आयटी क्षेत्रातील मान्यवर आणि उच्चशिक्षितदेखील या दिंडीत सहभागी होत आहेत. पुणे ते सासवड आणि सासवड ते वाल्हेदरम्यान पुण्यातील वारीचा आयटी दिंडी नावाचा एक ग्रुप प्रत्येक वर्षी सहभागी होत असतो. देहू ते पुणे आणि आळंदी ते पुणे यादरम्यानही अनेक युवक वारीत अत्यंत उत्साहाने सहभागी होत आहेत. नव्या पिढीला वारीचे आकर्षण वाटणे ही बाब स्वागतार्ह आहे. वारीची परंपरा नवी पिढी नेटाने पुढे चालवत
आहे.

उत्तरार्ध

Back to top button