बार्शी : कासारवाडी दुर्घटनेतील जबाबदार अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई | पुढारी

बार्शी : कासारवाडी दुर्घटनेतील जबाबदार अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई

बार्शी : पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी (ता. बार्शी) येथील रहिवासी तथा बार्शीतील जनसेवा हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश गुंड यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता व तंत्रज्ञ अशा दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने कासारवाडी येथील अनेक ठिकाणी तारा तुटून पडल्या होत्या. याची कल्पना संबंधित शेतकर्‍यांनी विज वितरण कंपनीस दिली होती. मात्र, कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने नुकतीच कासारवाडीत दुर्घटना घडुण मुख्याध्यापक गुंड यांचा जीव गेला होता. तारा तुटल्याची माहिती दिल्यानंतर जर वीज वितरण कंपनीकडून याची दखल घेतली गेली असती तर दुर्घटना घडली नसती. नातेवाईकांकडून दुर्घटनेबाबत उर्जा मंत्र्यांसह संबंधित कार्यालयास तक्रार देण्यास आली होती. याची दखल वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आली.

शेतकरी तथा कासारवाडीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश गुंड हे शेतात पडलेली तार लाकडाच्या सहाय्याने बाजूला सारून ठेवत होते, त्याचवेळी अनावधानाने त्यांना तारेचा स्पर्श झाला आणि विजेचा शॉक बसला म्हणून त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे बंधू मुख्याध्यापक सतीश गुंड मदतीला धावून गेले होते. दरम्यान, त्यांच्या अंगावर विजेची तार पडली व विजेचा शॉक बसून, सतीश गुंड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Back to top button