सोलापूर : पाकणी येथे ९३० पोती गुटखा, तंबाखू जप्त | पुढारी

सोलापूर : पाकणी येथे ९३० पोती गुटखा, तंबाखू जप्त

सोलापूर ‌: पुढारी वृत्तसेवा : सोलापूर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री पाकणी येथे ९३० पोती गुटखा व सुगंधी तंबाखू पकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, हा गुटखा नेमका कोठून कोठे जात होता, याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

कापूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सोलापूर पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाला माहिती दिली. त्यावरून सोलापूर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने पाकणी याठिकाणी एमएच ४६ एएफ ६११७ आणि एचआरएसएक्स ८०५१ या वाहनांची तपासणी केली. या दोन्ही वाहनांमध्ये पांढऱ्या प्लास्टिक पोत्यामध्ये गुटखा व सुगंधी तंबाखू असल्याचे दिसून आले.

पाकणीजवळील हॉटेल वासुदेव या ठिकाणी दोन्ही कंटेनर अडवून कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हिरा पान मसाला व रॉयल ७१७ तंबाखूची ९३० आढळून आली. या गुटख्याची किंमत एक कोटी ७४ हजार रुपये इतकी असून, दोन्ही कंटेनर मिळून १ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विजापूर रोडवरील तेरामैल येथून हे दोन्ही कंटेनर गुटखा घेऊन तुळजापूरच्या दिशेने जाणार होते, असे समजते.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांगे, पोलीस हवालदार संजय देवकर, पोलीस नाईक अनंत चमके, नागेश कोणदे, गणराज जाधव, रवींद्र साबळे, सिद्धलिंग बिराजदार यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button