सोलापूर : नागणसुरचे श्रीमनिप्र रेवणसिद्धेश्वर महास्वामी यांचे निधन | पुढारी

सोलापूर : नागणसुरचे श्रीमनिप्र रेवणसिद्धेश्वर महास्वामी यांचे निधन

सोलापूर,पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील बसवलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्रीमनिप्र रेवणसिद्धेश्वर महास्वामी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. पुरणपोळी आणि तुपाचा ते दासोह चालवायचे. त्यांच्या निधनामुळे सर्व भक्तावर शोककळा पसरली आहे.

तुपाचे होमहवन केल्याने तृप्ती मिळत नाही. तेच तूप गरजूंना खाऊ घातले. माणुसकीच्या या भावनेतून होमहवन न करता विज्ञानवादी दृष्टिकोन पेरण्यासाठी महास्वामींनी आयुष्यभर चळवळ उभी केली. पूर्व मठाधिपती बसवलिंगेश्वर महास्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाच हजार जंगम, पाच हजार सुवासिनी यांची ओटी भरून पुरणपोळी आणि तुपाचे पंचपक्वान्न असा महाप्रसाद ते देत होते. तूप चमच्याने नव्हे तर जग, तांब्याने वाढले जाते. या महाप्रसादाचा लाखो भक्त एकाच दिवशी आस्वाद घेत होते. 10×12 जागेत एक खोली असलेल्या मठाचे एक विशाल वटवृक्षात रुपांतर करणारे धर्मप्रसारक, समाज प्रबोधनकार, युगप्रवर्तक महास्वामी होते.

मानवीयता, दयाभाव, प्रबोधन हे त्यांचे कार्य होते. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीला ते नेहती प्रोत्साहन देत होते. यामुळे मठामध्ये दरवर्षी भजन, भारुड, नाटक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. सामुदायिक विवाह सोहळा करून सर्वधर्मसमभावही त्यांनी जपला होता. दरवर्षी होणाऱ्या मठाच्या उत्सवात स्वखुशीने मोफत वाहतूक सेवा बजावली जायची. या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. त्यांच्या कार्यामुळे नागणसूर बसवलिंगेश्वर मठाला तूप, पुरणपोळीचे मठ आणि महास्वामींना तुपाचे तीर्थ देणारे महास्वामी या नावाने ओळखले जात होते.

Back to top button