सोलापूर : पिलीव परिसरात ऊस उत्पादक हवालदिल | पुढारी

सोलापूर : पिलीव परिसरात ऊस उत्पादक हवालदिल

सोलापूर / पिलीव : पुढारी वृत्तसेवा :  माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील ऊस तोडणीसाठी कारखान्याचे चिटबॉय ऊसतोड कामगारांचे टोळीप्रमुख, मुकादम यांच्या संगनमताने मागेल तेवढे पैसे मोजावे लागत आहेत. सुमारे दहा हजार रुपयेएकरी आर्थिक भुर्दंड ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.

पिलीव परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. मात्र, यंदा शेतकरी ऊस जात नसल्याने अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे, त्यामुळे पाण्याची पातळी दररोज कमी होऊ लागली आहे. गेल्या सतरा- अठरा महिन्यांपासून सांभाळलेला ऊस अद्यापही रानातच उभा आहे. कारखान्याकडे रितसर नोंद आहे; पण ऊस अजून तुटेना. उसाने तुरा टाकल्यामुळे उसाच्या अक्षरशः फुकार्‍या झाल्या असून वजनात प्रचंड घट झाली आहे. एकरी 50 ते 60 टन जाणारा ऊस वेळेत न गेल्यामुळे 30 ते 40 टनच जाऊ लागला आहे. ऊस नेणे सध्या कारखाना प्रशासनाकडे राहिलेले नाही. कारण प्रशासन सांगत आहे, तुम्ही टोळी बघा आणि त्यांचे काय असेल ते तुमचे तुम्ही मिटवा, आम्ही काही करु शकत नाही.

भला मोठा खर्च करुनही शेतकर्‍यांना आपला ऊस तोडण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कारखान्याचे सभासद असूनही तसेच नोंद असूनही एवढी विचित्र वेळ शेतकर्‍यांवर का आली आहे? कारखान्याने यावर काही तोडगा काढण्याऐवजी तोडणार्‍याला पैसे द्या, म्हणून कारखाना खतपाणी घालत आहे. तर, कारखाना सूत्रांकडून अनधिकृतपणे ऊस पेटवायला सांगितले जात आहे. मग ऊस तोडणी केली जात आहे. त्यामुळे वजन कमी होत आहे. शेतकर्‍यांवर अशी वाईट वेळ आली आहे. मात्र, कारखानदार चिडीचूप आहेत.

कारखान्याच्या सोयीसाठी सुरुवातीला बाहेरच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील ऊस तोडला. मात्र, कारखान्याकडे नोंद असलेला ऊस लवकर न दिल्याने शेतकर्‍याची अशी केविलवाणी अवस्था कारखान्याने केली आहे. तरीसुद्धा रानातील सर्व ऊस तोडल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत व टोळ्यांकडून होणारी शेतकर्‍याची आर्थिक व मानसिक लूट थांबवावी, अशी ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. सध्या सर्व शेतकरी संघटना मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत ऊस तोड कधी येते, याची आतुरतेने वाट पाहत संबंधित कारखान्याच्या चेअरमन डे व मध्यस्थाकडे गळ घालत, हेलपाटे मारताना दिसत आहेत.

एकरी 10 हजार तोडणी

ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांना सध्या एकरी 10 हजारांपासून 14 हजार तसेच वाहनचालकाला प्रत्येक खेपेला 200 रुपये, जेवणाचा डबा तसेच ऊस तोडणार्‍याला सर्वच वाडे तसेच चिकन, मटण द्यावे लागत असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सांगतात.

Back to top button